Arakshan Andolan In Delhi: सध्या देशात आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत बेमुदत धरणे देण्यात येणार आहेत. आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करीत असवेला इतर राज्यातील पाटीदार, गुर्जर, जाट समाजही मराठा समाजासोबत या आंदोलनात सहभागी होणार आहे.
“ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात आंदोलने सुरु आहेत. यावरुन तणावही वाढत आहे. हा प्रश्न सोडवून सामाजिक एकता कायम ठेवायची असेल तर एकूणच आरक्षणाची मर्यादा वाढवणे गरजेचे आहे.
त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून दिल्लीत २५ जूलैपासून जंतरमंतरवर मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अ.भा. मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले. अ.भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.
गेल्यावर्षीही याच मागणीसाठी २५ जुलैस एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन नवी दिल्लीतील जंतरमंतरवर करण्यात आले होते. यावर्षी २३ आणि २४ जुलैस मराठा महासंघाचे पदाघिकारी नवी दिल्लीत जाऊन राज्यातील सर्व खासदार आणि केंद्रीय मंत्री यांना भेटून आरक्षण मर्यादा वाढविण्याचे निवेदन देणार आहेत.
“कॅांग्रेस नेते राहूल गांधी आणि शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनीही आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीचे समर्थन केलेले आहे. त्यामुळे यावर्षी संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होईल तेव्हा या मागणीसाठी आम्ही दिल्लीत जंतरमंतरवर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात अखिल भारतीय जाट महासभेचे सरचिटणीस युध्दवीर सिंह, अ.भा.किसान युनियनचे राकेश सिंह टिकैत,अ.भा.गुजर महासभेचे सुभाष गुजर हे सुध्दा सहभागी होणार आहेत,”अशी माहिती त्यांनी दिली.
“सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा लढ्याला मराठा विरुध्द ओ.बी.सी समाज असे स्वरुप देवून सामाजिक दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही राज्यकर्ते जाणीवपूर्वक करीत आहेत. हे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्यास हानीकारक असल्याने त्याचे आम्हास अतीव दुःख होत आहे.
समाजाचा मोठा भाऊ या नात्याने समाजातील सामाजिक वीण घट्ट राखून हा प्रश्न सोडविला जावा,अशी आमची भूमिका आहे. प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेला मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सामंजस्याने व एक मताने सोडविण्यासाठीच अखिल भारतीय मराठा महासंघ आरक्षणावरील मर्यादा वाढविण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे दहातोंडे पाटील म्हणाले.
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, द्रष्टे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने सन १९०० मध्ये स्थापन झालेली अखिल भारतीय मराठा महासंघ सामाजिक संस्था असून गेल्या १२४ वर्षापासून बहुजनांचे हित साधण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. मराठा महासंघाच्या माध्यमातून अनेक समाज नेत्यांनी भारत देशाचा स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा तसेच अनेक सामाजिक चळवळीत अग्रेसर राहून मोलाचे योगदान देणारे समाज नेते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत.
याच विचारांचा वारसा घेवून मराठा महासंघाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अॅड्. शशिकांत पवार उर्फ (अप्पासाहेब) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ही सामाजिक समतेची चळवळ गेली ५० वर्षे अव्याहतपणे चालू ठेवली. १९७८ साली मराठा महासंघाने पुढाकार घेवून चालू केलेला आरक्षणाचा लढा आज एका महत्वाच्या टप्प्यावर येवून पोहोचलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.