विधानसभेचं रणशिंग फुंकलं... तारखा जाहीर झाल्या... राजकीय पक्षांची तयारी तशी आधीच सुरु होती पण आता या तयारीला वेग आला आहे. जागावाटपाच्या सुरु असलेल्या चर्चा.. बैठका.. फायनलपर्यंत येऊन पोहोचल्यात. महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेत. पण मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, विद्यमान आमदार आपल्यालाच तिकीट मिळेल या कॉन्फिडन्सनं पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पालथा घालतायेत. कारण यंदाची निवडणूक ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. आमदारांसोबत अनेक मंत्र्यांचीही धाकधूक वाढली आहे. आता इतर भागात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा थेट सामना असला तरी मराठवाड्यात मात्र जरांगे पाटलांच्या फॅक्टरचं भलमोठं आव्हान नेत्यांपुढं आहे. खास करून महायुतीच्या आणि गेल्या काही दिवसांपासूनच राजकारण पाहिलं तर मुंडे घराण्याच्या. लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव कशामुळे झाला हे काही नव्यानं सांगयला नको, पण याच जरांगे फॅक्टरचा फटका धनंजय मुंडेंनासु्द्धा बसू शकतो.