विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झालेल्या बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लूटमार आणि दरोड्याच्या घटनांमुळे बांगलादेशातील अनेक नागरिकांची झोप उडाली आहे.
‘‘काल रात्री काही गुंडांच्या सशस्त्र टोळ्यांनी आमच्या शेजारच्या घरावर हल्ला केला. त्यांनी तेथे धुडगूस घातला आणि घरातील दागिने आणि पैसे लुटले’’ अशी माहिती येथील नवोदय हाउसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने स्थानिक माध्यमांना गुरुवारी दिली.