Children Health Tips : मुलांमध्ये झोपेच्या समस्या; वेळीच काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
मुलांमध्ये वाईट स्वप्न पडून झोप बिघडण्याने कुटुंब अस्वस्थ होत असते. स्वप्न ही मुलांच्या वातावरणातील काही ताणामुळे, वाईट अनुभवामुळे, शाळेतील काही तणावपूर्ण घटनांमुळे पडू शकतात.
-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com
ज्या मुलांना पुरेशी झोप (Children Sleep Problems) मिळत नाही त्यांच्यामध्ये थकव्यामुळे अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता वाढते तसेच त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात वर्तणूक समस्या जसे की चंचलता, मनस्थितीतील तीव्र बदल, विस्मरण किंवा एकाग्रता कमी होणे, आकलन क्षमता कमी होणे, अतिखाणे तसेच कृतिशीलता कमी होणे असे होऊ शकते. या सर्व कारणांमुळे मुलांना पुरेशी झोप मिळणे हे त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे....
सौरभची आई सांगत होती, सौरभचे हल्ली लक्षण ठीक वाटत नव्हते. १३ वर्षाच्या सौरभला गेमिंगचा नाद लागला होता. दिवस-रात्र तो व्हिडिओ गेम (Video Games) खेळण्याच्या नादात संवाद, मित्र आणि झोप हरवून बसला होता. त्याचे वागणे विचित्र वाटू लागले होते. चिडचिड करायचा आणि तंद्रित असायचा. एक आठवड्यापासून तो नीट झोपलाही नव्हता. अपुऱ्या झोपेमुळे त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात आले होते. डिजिटल जगात सातत्याने वावरणाऱ्या आपल्या मुलांमध्ये अनिद्रा किंवा झोप न येण्याची समस्या बळावत चालली आहे. मुलांना पुरेशी झोप मिळाली नाही तर मुलांमध्ये शैक्षणिक कार्यक्षमता कमी होते. शाळेतील अवांतर उपक्रमातील सहभाग कमी होतो. इतरांशी मैत्री करण्यात बाधा निर्माण होते. समाजात मिसळणे कठीण होते.
ज्या मुलांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांच्यामध्ये थकव्यामुळे अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता वाढते तसेच त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात वर्तणूक समस्या जसे की चंचलता, मनस्थितीतील तीव्र बदल, विस्मरण किंवा एकाग्रता कमी होणे, आकलन क्षमता कमी होणे, अतिखाणे तसेच कृतिशीलता कमी होणे असे होऊ शकते. या सर्व कारणांमुळे मुलांना पुरेशी झोप मिळणे हे त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मुलांमधील झोपेची गरज बदलत जाते. १ वर्षाचे मूल सरासरी १५ तास झोपते तर ४ वर्षाचे मूल १२ तास झोपते. १५ वर्षाचे होईपर्यंत झोपेची गरज ८ तासापर्यंत आलेली असते.
मुलांमधील झोपेच्या समस्या -
स्लीप एप्निया : श्वास मध्येच बंद झाल्याने झोप बिघडणे, झोप न लागणे, पूर्ण रात्रभर झोप न टिकणे, दिवसा झोप येणे, झोपेत चालणे, वारंवार स्वप्न पडणे, झोपेत दात वाजवणे, बिछाना ओला करणे, पायाच्या चळवळीमुळे बेचैन झोप, सकाळी उठण्यास न जमणे इत्यादी.
अनिद्रेचे प्रमाण मुलांमध्ये व कुमारांमध्ये वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढते डिजिटलायझेशन, व्यायामाची कमतरता तसेच वाढती स्पर्धा व ताण. झोपेच्या समस्या टाळायच्या असतील तर पालकांनी मुलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण द्यावे. झोपेची नियमित वेळ ठरवावी व ती आग्रहाने राबवावी. झोपेच्या आधी पाच ते सहा तास मुलांनी उत्तेजक पेय टाळावीत जसे कोला, चहा, कॉफी तसेच झोपेच्या आधी किमान एक तास टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर किंवा कुठलीही स्क्रीन बघणे टाळावे. सकाळी ठराविक वेळेतच उठावे. आधी उठल्यास मुलांना पुन्हा झोपवावे.
सर्वसाधारणपणे दहा वर्षाच्या मुलास दहा तासाची झोप गरजेची असते तर १६ वर्षाच्या मुलास आठ तासाची झोप पुरेशी असते. मुलांसारखीच कुमारांचीही उठण्याची वेळ नियमित असावी. व्यायामामुळे झोपेला प्रोत्साहन मिळते त्यामुळे रोज व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. झोपण्याची जागा झोपेला पोषक करण्याचा प्रयत्न करावा जसे की, खूप उजेड खूप आवाज किंवा सौम्य तापमान असेल तर गाढ झोप लागण्यास मदत होते. झोपेआधी उत्तेजक पेय जसे कोला, चहा, कॉफी टाळावे. झोप येत नसल्यास उठावे, सौम्य वाचन किंवा इतर सौम्य कृतीत मन गुंतवावे. शक्यतो उत्तेजक सिनेमा बघणे टाळावे. झोप आल्यावर बिछान्यात परतावे आणि जरी रात्री झोप झाली नसली तरी ठराविक वेळेतच उठावे.
मुलांमध्ये वाईट स्वप्न पडून झोप बिघडण्याने कुटुंब अस्वस्थ होत असते. स्वप्न ही मुलांच्या वातावरणातील काही ताणामुळे, वाईट अनुभवामुळे, शाळेतील काही तणावपूर्ण घटनांमुळे पडू शकतात. हे जर क्वचित होत असेल तर हे साधारण आहे; परंतु जर पुन्हा पुन्हा वाईट स्वप्न पडत असतील तर त्याचा शोध घेऊन मुलाची मदत करणे आवश्यक असते. पुन्हा पुन्हा वाईट स्वप्न पडणे हे मनावर आघाताचेही लक्षण असू शकते. मुलांमध्ये क्वचित झोपेत चालणे किंवा बोलणे दिसून येते. शक्यतो याचे काही दुष्परिणाम नसतात. कालानुरूप हे कमी होत जाते. तरी मुलाला इजा होणार नाही यासाठी त्यांच्यापासून तीक्ष्ण गोष्टी दूर ठेवावे. मूल झोपेत घराबाहेर पडून त्याला इजा होऊ नये म्हणून घर लॉक करावे.
झोपेत श्वास बंद होणे : ही घशामध्ये टॉन्सिल्स वाढल्यामुळे होऊ शकते. श्वास बंद झाल्यामुळे मेंदूला तात्कालीक प्राणवायू खंडित होतो. मेंदूला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याची वर्तणूक समस्या, भावनात्मक समस्या निर्माण होऊ शकतात. स्थूलता, घोरणे हेही याचं कारण असू शकते. तसे असल्यास तपासणी करून घ्यावी. झोप ही आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जी मुले पुरेशी झोप घेतात ती प्रसन्न मनाची आणी निरोगी असतात. आजच्या डिजिटल जगात झोपेची स्पर्धा विविध मनोरंजक अॅपशी आहे. तरी मुलांचे बालपण सुरक्षित करूया आणि मुलांना पुरेशी झोप मिळेल हे पाहूया.
(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.