व्यसन मोबाईलचं

आपण गेल्या आठवड्यात हे पाहिलं, की मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूत डोपामाईन सतत तयार होत राहतं.
Mobile Addiction
Mobile Addictionsakal
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण गेल्या आठवड्यात हे पाहिलं, की मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूत डोपामाईन सतत तयार होत राहतं. त्याच सोबत इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही- कारण मोबाईलच्या वापरानंच सर्वाधिक डोपामाईन मिळू लागतं. याला एका अर्थी मोबाईलचं व्यसन लागणं म्हणूनही बघितलं जाऊ शकतं.

आपल्याला सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आणि स्क्रीन टाइममुळे मेंदूतील दोन भाग जागे होतात

१) भीती वाटणारा भाग

आपल्याला कोणाचा मेसेज आला, आपण तो वाचू शकलो नाही किंवा फोन आला आणि आपण तो उचलू शकलो नाही किंवा आपल्या आवडत्या चॅनेलवर नवा व्हिडियो अपलोड झाला आणि आपण तो पाहू शकलो नाही, तर आपल्या नकळत आपल्यामध्ये एक भीती निर्माण होते; काहीतरी महत्त्वाचं चुकल्याची भीती किंवा तोटा झाल्याची भीती, जगासोबत संपर्कात तुटण्याची भीती. (FOMO-Fear Of Missing Out)

२) आनंद मिळेल असं वाटून कार्य करणारा भाग (Reward system)

आपण मोबाईल बघितला, तर आपल्याला आनंद मिळेल असं वाटून आपण सतत मोबाईल हाताळू लागतो, सारखी सारखी ॲप्स उघडतो आणि तो डोपामाईनमुळे मिळणारा आनंद मिळवू पाहतो.

मेंदूतील या दोन्ही physiological भागांचा अभ्यास करून सर्व सोशल मीडिया बनवले जातात आणि सतत आपल्याला मेंदूला चालना मिळत राहते.

विचार करा, नैसर्गिकरित्या मेंदूमध्ये जितकी ॲक्टिविटी अनेक तास शारीरिक काम केल्यानंतर आणि दिवसातून फक्त सात-आठ वेळा होणं अपेक्षित आहे, तितकी काही मिनिटं मोबाईल बघून होते आणि दर काही मिनिटांनी मेंदूला चालना मिळत राहते. एक अर्थी आपण प्रकृतीला चकवा देत आहोत. यामुळे आपल्या मेंदूमधील पेशी थकतात आणि मेंदूतील निर्णयक्षमता, विचार करणं, एकाग्रता हे काम जिथं होतं तो भाग थकतो आणि amygdala (भावना संतुलन व भावनिक स्मरणशक्ती, चिंता, आक्रमकता, सामाजिक अनुभूती (social cognition) हे सर्व कार्य करणारा) नावाचा भाग अधिक कार्यरत होतो आणि सतत पॅनिक आणि स्ट्रेस तयार करतो.

एका बाजूला शरीराची हालचाल न झाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह होतातच; तसंच मेंदूमधील असंतुलनामुळे मानसिक आणि भावनिक आजारही उद्‍भवतात.

यामुळेच मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये हळूहळू चिडचिड वाढत जाते, ते कोणत्याही विषयामध्ये एकाग्रता करू शकत नाहीत आणि कोणताही निर्णय घ्यायची वेळ असेल, तर ताण तयार होऊन anxiety निर्माण होते. तसंच स्क्रीनमधून डोळ्यांवर पडणाऱ्या प्रकाशामुळे शरीराला आणि मेंदूला सकाळ आहे की रात्र हे न कळल्यानं आपली शारीरिक दिवस-रात्रीची लय (circadian rhythm) बिघडते. रात्री झोप न येणं, सतत विचार येणं, सकाळी थकवा वाटणं इत्यादी त्रास होऊ लागतात.

याचं समर्पक उदाहरण म्हणजे लहान मुलं. पाच वर्षांच्या खालील वयात आपण त्यांना रोज मोबाईल किंवा टीव्ही दाखवला, तर हळूहळू त्यांना त्याची सवय लागते, न बघू दिल्यास चिडचिड होते, ती कोणत्याही थराचा हट्ट करून आपल्याकडून मोबाइल घेतातच! इतक्या एकाग्रतेनं ती स्क्रीनकडे बघतात, की हाक मारली तरीही त्यांचं लक्ष जात नाही.. पण यामुळेच अभ्यासाला बसताना एका जागी न बसता येणं, चलबिचल होणं, मन एकाग्र न होणं, लक्षात न राहणं इत्यादी दोष उद्‍भवतात.

आपल्याला हताश होण्याची गरज नाही, कारण चांगली बाब म्हणजे व्यायाम केल्यानं डोपामाईन अधिक तयार होतं. म्हणजेच व्यायाम आपल्याला मोबाईलच्या अधीन होण्यापासून वाचवू शकतो. एकाग्रतेनं एकावेळी एकच गोष्ट मन लावून करणं, निसर्गात अधिक वेळ घालवणं, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सतत संवाद ठेवणं, रात्री झोपण्यापूर्वी दीड तास मोबाईल न वापरणं या गोष्टींची काळजी घेतल्यास मोबाईलचे दुष्परिणाम कमीत कमी अनुभवायला येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.