Child Care Tips: मुले एकलकोंडी अन्‌ चिडचिडी होताहेत? आयुर्वेदानुसार मुलांच्या आहार, निद्रा व दिनक्रमात हे बदल करा

पूर्वीच्या आणि आजच्या काळाची तुलना केल्यास ५०-६० वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या राहणीमानात खूपच बदल झालेला दिसून येईल
 Child Care Tips
Child Care Tipsesakal
Updated on

Child Care Tips: पन्नास ते साठ वर्षांपूर्वी एकल कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यावेळी लहान मुलांवर घरातील आई-वडिलांसह आजी-आजोबा, काका-काकू अशा घरातील सदस्यांसह शेजारील लोक, पै-पाहुणे यांमध्ये लहान मुले माणसाळलेली होती.

आता फार तशी परिस्थिती राहिली नाही. आताच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे (मायक्रो न्यूक्लिअर फॅमिली) एकच मूल किंवा दोन मुले, शेजारच्यांशी संबंध नाही, आई- वडील नोकरी- व्यवसायात व्यस्त अशा परिस्थितीत मुले एकलकोंडी, चिडचिडी झाली आहेत. त्यांची एकाग्रता कमी व चंचलता वाढलेली आहे.

पूर्वीच्या आणि आजच्या काळाची तुलना केल्यास ५०-६० वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या राहणीमानात खूपच बदल झालेला दिसून येईल. मागील वीस-वीस वर्षांच्या तीन कालखंडांचा अभ्यास केल्यास एकूणच आधुनिक जीवनशैली व शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे.

लोकांची राहणीमान व गरजा बदलल्या आहेत. प्रवास, जेवणखाण, वैचारिक राहणीमानात बदल झाला आहे. १९८० ते १९९०, १९९० ते २००० व २००० सालापासून ते आजपर्यंत राहणीमानात खूप मोठा फरक पडल्याचे दिसून येते.

लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता आहार, निद्रा व दिनक्रमाचा विचार आयुर्वेदात केला गेला आहे

क्षिराद, क्षिरान्नाद व अन्नाद

लहान मुलांच्या आहारात क्षिराद, क्षिरान्नाद व अन्नाद हे तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत. क्षिराद म्हणजे वयाच्या तीन वर्षांपर्यंत आईच्या किंवा गाईच्या दुधावर अवलंबित असणारे बालक मोडतात. क्षिरान्नादमध्ये तीन ते दहा वयोगटातील मुलांना क्षीर, दूध व अन्नद्रव्य, चपाती, भाजी, कडधान्ये, भाकरी, फळे, ड्रायफ्रूट्स असे मिश्र प्रकार आवश्यक असतात.

अन्नादमध्ये आठव्या वर्षांपासून पुढे दुधाचा आहार कमी होत अन्नावर आधारित असलेली मूल मोडतात. असे आहार संस्कार मुलांवर योग्य त्या वयात करणे गरजेचे आहे. याने लहान मुलांचे संपूर्ण शारीरिक विकास घडते. भारतीय आहारशैली पालकांना शिकवण्याची गरज आहे. कारण, आधुनिक जीवनशैली या नावाखाली फास्ट फूड, जंक फूड, तयार पॅकेटमधील पदार्थ खाणे हे पालकांचे अनुकरण मुलेही करतात.

कृत्रिमरीत्या तयार पदार्थांचे शरीरावर वाईट परिणाम होतात. आयुर्वेद व भारतीय आहार शास्त्रानुसार आहार हे ‘सेंद्रिय’ (स-इंद्रिय) आहे. आहारात आपल्या इंद्रियांवर प्रभाव करणारे घटक असतात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिय, उभयात्मक मन, बुद्धी व आत्म्यापर्यंत आहाराचा प्रभाव असतो. आहारात सात्त्विक आहार असणे आवश्यक आहे.

Child Care Tips
Child Care Tips

फास्टफूड, जंकफूडमुळे विकृत जंतांची निर्मिती

दोन ते तीन लाख विविध सूक्ष्म जंत आपल्या पोटात असतात. त्यातील ९५ टक्के जंत उपयोगी असतात. पचनसंस्थेपासून विविध अवयवांचे ते रक्षण करतात. याला गट मायक्रोबायोमा किंवा गट फ्लोरा असे म्हणतात. मात्र फास्ट फूडमुळे, आजच्या आहारातून येणारे अतिप्रमाणातील खते, दूषित पाणी, अनावश्यक अँटिबायोटिक घेणे याने हा गट फ्लोरा बिघडत आहे.

आणि अनेक चित्रविचित्र आजार लहानमोठ्या सर्वांत दिसत आहेत. पाश्चात्त्य जगात यावर दररोज नवनवीन संशोधन होत आहेत. तसेच या फास्ट फूड व विरुद्ध आहारामुळे आपल्या पोटात विकृत जंत निर्माण होतात, ज्यामुळे शरीराला बाधा निर्माण होते.

अशा आहारामुळे पोट दुखणे, चिडचिडेपणा, सतत आजारी पडणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असे विकार जडतात. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृमी चिकित्सा केल्यास फायदेशीर ठरते.

मुलांना हवी नैसर्गिक झोप

पूर्वी वेळेवर झोपणे व उठणे याला महत्त्व होते. आज मोबाईल, टीव्हीत व्यस्त पालकच उशिरा झोपतात व उशिरा उठतात. पालकांचे हे अनुकरण करत मुलेही सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत उठतात. निद्रा ही शरीराला ‘रिबूट’ करणारी संस्था आहे. आपण दिवसभरात शरीराच्या विविध संस्थांचा वापर केलेला असतो.

त्या इंद्रियांना शांत करून त्यांच्यात साहचर्य निर्माण करण्यासाठी निद्रा ही निसर्गाने केलेली किमया आहे. त्यामुळे वेळेवर झोपणे व उठणे महत्त्वाचे आहे. आरोग्य उत्तम राखायचे असेल तर आहाराखालोखाल निद्रेलाही महत्त्व देणे आवश्यक आहे.

लहान मुलांना नैसर्गिक झोप आवश्यक आहे. अवेळी झोपेमुळे चयापचय बिघडते. मेंदूतील अल्फा, बिटा, गॅमा व डेंटा या लहरी निद्रेमुळे संतुलित होतात. अवेळी झोपेमुळे शरीरातील नैसर्गिक चक्र व संतुलन बिघडते.

 Child Care Tips
Child Care तुमची मुलंदेखील रात्री उशिरापर्यंत झोपत नाही, मुलांना लवकर झोपवण्याचे काही उपाय

मुलांना करून द्या आरोग्याची जाणीव

स्पर्धेच्या युगात माझा मुलगा ‘सुपरमॅन’ व्हावा, या अनाठायी इच्छेमुळे अभ्यास, शाळा, क्लासचा भडिमार होण्यामुळे मुले भरडली जातात. त्यामुळे मुलांना स्वतःला काय हवं, याकडे दुर्लक्ष झाल्याने मुले भेदरलेली असतात. परिणामी त्यांची स्वतःची विचारशैली विकसित होण्यात अडथळे येतात.

त्यांच्या चिकित्सा बुद्धीवर परिणाम होतो. शून्य ते दहा वयोगटातील मुलांना आरोग्याची जाणीव करून द्यावी, जसे की दिनचर्या, ऋतुचर्या, आहारातील जीवनसत्त्वे, ड्रायफ्रूट्स, फलाहार, योगासने, सूर्यनमस्कार, आयुर्वेदिक सुवर्णप्राशन, व्यायाम आदींचे ज्ञान द्यावे.

 Child Care Tips
Parenting Tips : मुलांला आदर्श व्यक्ती बनवायचंय? तर पालक म्हणून सुधा मुर्तीजींनी सांगितलेल्या या गोष्टी बदला!

जाणून घ्या बालकाची जननप्रकृती

प्रत्येकाचे शरीर व मानसभाव वेगवेगळे असतात. वात, पित्त व कफ प्रकृतीनुसार शरीराचा गुणधर्म व स्वभाव निसर्गतः आलेले असतात. त्यात बदल होत नसतो. मात्र आजच्या पालकांना बालकांची जन्मत: जननप्रकृती जाणून घ्यायची इच्छाच नाही.

मुलांच्या शरीराच्या निसर्गाविरुद्ध नको त्या गोष्टी शिकवल्या तर मुलांचे शरीर ते स्वीकारत नाही. निसर्ग प्रकृतीचा पालकांनी आदर करावा. (Lifestyle)

 Child Care Tips
Childcare : पालकांनो बाळाचे चुंबन घेणे धोकादायक, होणारे नुकसान वाचून व्हाल थक्क

मूळ भारतीय जीवनशैली अन्‌ सनातन ज्ञानाचे पुनर्भरण गरजेचे

आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉ. राघवेंद्र नादरगी म्हणतात, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आता नवीन गरज निर्माण झाली आहे ती माहिती (इन्फॉर्मेशन)ची. या माहितीजालाच्या आधुनिक जीवनशैलीत भारतीय जीवनशैली विसरली जात आहे.

आधुनिक जीवनशैली, वाढती महागाई, स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याची अनाठायी स्पर्धा यामुळे मुलांच्या आरोग्याकडे सर्वंकष दृष्टिकोनात काय परिणाम होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. (Children)

Child Care Tips
Child Care Tips

आई- वडिलांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत, सोशल मीडियाचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या विचारधारेवर होत आहे. गरज नसलेल्या गोष्टी आपल्याकडे असण्याचा कल नकळतपणे होत आहे. आणि त्याची सहज पूर्तता आई-वडील आपल्या मुलांना करत आहेत.

परिणामी मुले हट्टी, शीघ्रकोपी, चिडचिडी होत आहेत. त्यामुळे मूळ भारतीय जीवनशैलीची गरज आणि सनातन ज्ञान याचे पुनर्भरण होणे गरजेचे आहे.

श्रीनिवास दुध्याल : सकाळ वृत्तसेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.