India men's archery team in Paris Olympic 2024: दीपिकाकुमारी, भजन कौर व अंकिता भकत या महिला तिरंदाजांकडून रविवारी निराशा झाल्यानंतर भारताच्या पुरुष तिरंदाजांनाही पॅरिस ऑलिंपिकमधील उपांत्यपूर्व फेरीत अपयशाचा सामना करावा लागला.
तरुणदीप राय, प्रवीण जाधव, धीरज बोम्मादेवरा या भारतीय तिरंदाजांना तुर्कीच्या तिरंदाजांचे आव्हान परतवून लावता आले नाही. तुर्कीच्या मेटे गॅझोझ, बर्किम ट्युमर व अब्दुल्ला यिलदिरमीस या तिरंदाजांनी अव्वल दर्जाची कामगिरी केली.
तुर्कीने भारतीय संघाला ६-२ असे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय तिरंदाजी संघाच्या पदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले.
पहिल्या सेटमधील सहा बाणांमधून भारतीय संघाला ५३ गुणांची कमाई करता आली. तुर्कीच्या तिरंदाजांनी ५७ गुणांची कमाई करीत पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यांना २ गुणांनी आघाडी मिळवता आली.
दुसऱ्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण येथेही तुर्कीच्या खेळाडूंनी बाजी मारली. ५५-५२ असा हा सेट जिंकत आपली आघाडी ४-० अशी पुढे नेली.
भारतीय तिरंदाजांनी तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. या सेटमध्ये प्रत्येकी पहिल्या तीन बाणानंतर तुर्कीच्या खेळाडूंकडे २८-२७ अशी आघाडी होती. पण त्यानंतरच्या तीन बाणांमध्ये भारतीय तिरंदाजांनी ठसा उमटवला.
भारतीय तिरंदाजांनी २८ गुणांची कमाई केली. याच वेळी तुर्कीच्या खेळाडूंना २६ गुणांची कमाई करता आली. अखेर या सेटमध्ये भारताने ५५-५४ असा अवघ्या एका गुणाने विजय साकारला व दोन गुण कमवले.
भारतीय तिरंदाजांना चौथ्या सेटमध्ये पुन्हा निराशेचा सामना करावा लागला. तुर्कीच्या तिरंदाजांनी ५८ गुणांची कमाई केली. भारतीय तिरंदाजांना मात्र ५४ गुणांवरच समाधान मानावे लागले. तुर्कीच्या खेळाडूंनी या सेटचे दोन गुण मिळवले. एकूण ६-२ असे यश संपादन करताना त्यांनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.