Diamond League Final 2024 Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला डायमंड लीग फायनल २०२४ मध्ये १ सेंटीमीटरच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८७.८६ मीटर लांब भाला फेकला होता, जो ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सपेक्षा ( ८७.८७ मी.) ०.०१ मीटर कमी अंतरावर पडला. अँडरसनने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या लांब भाला फेकला होता. जर्मनीच्या ज्युलियन वेबसला ८५.९७ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्य स्पर्धांप्रमाणे डायमंड लीगमध्ये पदक दिले जात नाही. इथे फायनलमध्ये अव्वल येणारा खेळाडूच विजेता ठरतो, परंतु त्याच्यासह अन्य सहभागी खेळाडूंना बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.