'डिअर ऑलिम्पियन्स, स्पर्धेनंतरच्या आयुष्यासाठी तुम्हाला कोणी तयार करत नाही, पण...', 'राणी'चं भारतीय खेळाडूंना भावनिक पत्र
Rani Rampal Post for Olympians: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा नुकतीच संपली. या स्पर्धेत ३२९ पदकांपैकी एक पदक मिळवण्यासाठी तब्बल १० हजार खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत ३२ क्रीडा प्रकार खेळवण्यात आल. भारताचे ११७ खेळाडू १६ क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते.
दरम्यान भारताची मोहिम ६ पदकांसह संपली. भारताला टोकियो ऑलिम्पिकच्या ७ पदकांच्या विक्रमाला मागे टाकता आलं नाही. पॅरिसमध्ये भारताची काही पदकं अगदी थोडक्यात हुकली.
अर्जुन बबुता, मीराबाई चानू, लक्ष्य सेन असे अनेक खेळाडू चौथ्या क्रमांकावर राहिले. तर भारताकडून मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्निल कुसाळे, नीरज चोप्रा, अमन सेहरावत आणि पुरुष हॉकी संघाने पदक जिंकले.
आता हे ऑलिम्पिक संपवून खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहेत. अशात भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने ऑलिम्पिक खेळणाऱ्या सर्वांसाठी एक खास पत्र लिहिलं आहे. तिचं हे पत्र भावनिक असून ऑलिम्पिकनंतर खेळाडूंच्या कशा भावना असू शकतात. त्यांना कसा त्रास होतो, यावर आहे.