Paris Olympic 2024 Gujarat Player : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ खेळाडूंचा ताफा घेऊन गेलेल्या भारतीय संघाला ६ पदकांवर समाधान मानावे लागले. भालाफेकीत नीरज चोप्राला रौप्यपदक जिंकता आले, तर नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक व मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं जिंकून इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक व कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्य जिंकले. पुरुष हॉकी संघानेही कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. पॅरिसमध्ये पदक जिंकणाऱ्यांपैकी ४ खेळाडू हे हरयाणाचे आहेत. गुजरातच्या दोन खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या दोन वेगवेगळ्या आकडेवारीवरून वाद सुरू झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११७ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते आणि त्यापैकी सर्वाधिक खेळाडू असलेल्या राज्यांमध्ये हरयाणा ( २५), पंजाब ( २०) आणि तामीळनाडू ( १३) हे आघाडीवर होते. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमधील खेळाडूंचा आकडा येतो, परंतु तो एकेरी आहे. इतके जास्त ऑलिम्पिकपटू देऊनही या राज्यांना दिल्या गेलेल्या क्रीडा विकासासाठीच्या निधीवरून वाद सुरू झाला आहे.
२०२१ मध्ये झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दिला गेलेला निधी
पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी केंद्र सरकारकडून निधी
अॅथलेटिक्स - ९६.०८ कोटी
बॅडमिंटन - ७२.०२ कोटी
बॉक्सिंग - ६०.९३ कोटी
नेमबाजी - ६०.४२ कोटी
हॉकी - ४१.२९ कोटी
तिरंदाजी - ३९.१८ कोटी
कुस्ती - ३७.८० कोटी
वेटलिफ्टिंग - २६.९८ कोटी
टेबल टेनिस - १२.९२ कोटी
ज्युदो - ६.३ कोटी
स्विमिंग - ३.९ कोटी
रोईंग - ३.८९ कोटी
सेलिंग - ३.७८ कोटी
गोल्फ - १.७४ कोटी
टेनिस - १.६७ कोटी
अश्वारोहण - ०.९५ कोटी
ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदाज किर्ती आझाद यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी खेलो इंडिया योजने अंतर्गत निधी वाटपात कसा पक्षपाती झाला आहे. हे दाखवणारे ट्विट केले आणि त्यावरून चर्चा सुरू झाली.
किर्ती आझाद म्हणतात, मणिपूर व हरयाणा यांनी देशाला सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं जिंकून दिली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजरातला क्रीडा विकासासाठी सर्वाधिक निधी दिला गेला आहे. या राज्याचं ना भारताच्या क्रीडा क्षेत्रात ना भारतीय सैन्यात फार योगदान आहे. पण, अर्थसंकल्पात त्यांना जास्त निधी दिला जातो.
आझाद यांनी ट्विटसोबत एक यादी पोस्ट केली आहे आणि त्यात कोणत्या राज्याला किती निधी याची आकडेवारी मांडली गेली आहे. खेलो इंडिया योजने अंतर्गत क्रीडा विकासासाठी सर्वाधिक निधी मिळालेल्या राज्यांत गुजरात व उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. गुजरातला ४२६.१३ कोटी, तर उत्तर प्रदेशला ४३८.२७ कोटी रुपयांचा निधी मान्य केला गेला आहे. देशाला सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं देणाऱ्या मणिपूर आणि हरयाणा या राज्यांना अनुक्रमे ४६.७१ व ६६.५९ कोटी दिले गेले आहे. महाराष्ट्राला ८७.४३ कोटी रुपये निधी मान्य केला गेला आहे.
किर्ती आझाद यांनी ट्विट केलेली माहिती खरी आहे. त्या त्या राज्यांत क्रीडा विकास व्हावा आणि चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या जाव्या यासाठी हा निधी दिला गेला आहे. हरयाणामध्ये खेळासाठीच्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास आधीच झालेला आहे आणि गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांत त्या तुलनेत विकास होणं बाकी आहे. त्यात २०३६ची ऑलिम्पिक स्पर्धा गुजरात येथे खेळवण्याचा विचार सरकारचा असल्याने येथे अधिक निधी दिला गेल्याची चर्चा आहे. यामागे राजकारणही असल्याचे काहींचे मत आहे.