- रोहिणी गोसावी
पॅरिस ऑलिंपिक हे इतिहासातलं पहिलं पर्यावरणपूरक ऑलिंपिक असणार आहे. ग्रीन ऑलिंपिक हेच या स्पर्धांचं ब्रीद आहे. पर्यावरणाची कमीत कमी हानी करत सगळ्याच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. म्हणूनच या स्पर्धांसाठीची ठिकाणं ही नेहमीपेक्षा वेगळी आहेत.
पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच फ्रेंच संस्कृती आणि इतिहास दाखवणं हाही यामागचा उद्देश आहे. म्हणूनच फ्रेंच प्रशासनानं पॅरिसमधल्या अनेक ऐतिहासिक इमारतींमध्ये स्पर्धा आयोजित केल्यात. या स्थळांवर टाकलेला दृष्टिक्षेप...
फ्रान्सच्या इतिहासातली महत्त्वाची वास्तू म्हणजे पॅरिसचा पॅले रॉयाल (रॉयल पॅलेस). फ्रान्समधला सगळ्यात मोठं काचेचं रुफ असलेला रॉयल पॅलेस हा १९०० मध्ये बांधण्यात आलेला होता. जो युनिव्हर्सल एक्झिबीशन्ससाठी वापरण्यात येतो. या पॅलेसमध्ये ऑलिंपिकमधील तलवारबाजी आणि तायक्वांडो आणि पॅरातायक्वांडो या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. इथं याआधीही तलवारबाजीची वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती.
फ्रेंच इतिहासाचं महत्त्वाचं पान म्हणजे वर्सायचा राजवाडा. पॅरिसपासून जवळपास २० किमी असलेल्या वर्सायमध्ये चौदाव्या लुईनं बांधलेला हा राजवाडा फ्रेंच संस्कृतीच्या सुबत्तेचं प्रतीक आहे. या राजवाड्याचं गार्डन हे शेकडो एकरांत पसरलेलं आहे. याच गार्डनमध्ये घोडेस्वारी या खेळाची स्पर्धा होतेय.
फ्रेच राज्यक्रांतीतली महत्त्वाची जागा म्हणजेच पॅरिसमधलं प्लास दे ला काँकर्ड. याच चौकात फ्रान्सच्या राजाला जनतेनं मृत्युदंड दिला होता. पॅरिसमधल्या अनेक ऐतिहासिक जागांना जोडणाऱ्या चौकात ऑलिंपिकच्या फ्रीस्टाईल स्केटबोर्डींग आणि बास्केटबॉल या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत.
पॅरिसचं प्रशासकीय केंद्र असलेलं सिटी हॉल एकेकाळी पॅरिसचं ऐतिहासिक चळवळींचं केंद्र होतं. इथून ऑलिंपिकच्या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे.
हे स्टेडियम आहे पॅरिसच्या जगप्रसिद्ध लॅंडमार्क असलेल्या आयफेल टॉवरच्या बाजूला. आयफेल टॉवरच्या गार्डनमध्ये हे स्टेडियम तयार करण्यात आलंय, ज्याला आयफेल टॉवर स्टेडियमही म्हटलं जातंय. इथं बीच व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. तलवारबाजी आणि तायक्वांडोच्याही काही स्पर्धा इथं होणार आहेत.
फ्रान्सच्या मिलीटरी इतिहासाचं साक्षीदार असलेलं म्हणजे आंवालीद. फ्रान्सचं आर्मी म्युझियम या जागेवर आहे. ही इमारत आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे जगप्रसिद्ध नोपोलियन बोनापार्टची समाधी. नेपोलियनचं टुम्ब अशीही या इमारतीची ओळख आहे. इथं ऑलिंपिकमधील तिरंदाजी या खेळाची स्पर्धा होणार आहे.
पॅरिसची लाइफलाइन असलेल्या सीन नदीच्या बाजूला ऑलिंपिकचा आयकॉनिक उद्घाटन समारंभ होणार आहे. सीन नदीतून आठ किमीचा बोटप्रवास करत सगळे खेळाडू आणि पाहुणे या उद्घाटन समारंभासाठी पोहोचणार आहेत.
ऑलिंपिकमधल्या अनेक स्पर्धा याआधीच बांधलेल्या ऐतिहासिक ठिकाणी होत असल्यानं स्थळं तयार करण्याची फार गरज पडली नाही. ज्या ठिकाणी काही स्टेडियम्स बांधण्यात आलीत, तीही तात्पुरती आणि इको फ्रेंडली मटेरियल वापरून बांधण्यात आलीत, जी स्पर्धा झाल्यानंतर काढून टाकण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.