India at Paris Olympic 2024 Lakshya Sen: ऐतिहासिक पदकाचे 'लक्ष्य' चुकले! जखमी असूनही २२ वर्षीय पोरानं प्रतिस्पर्धीला झुंजवलं

Paris Olympic 2024 Badminton Bronze Medal - ऑलिम्पिक स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवणाऱ्या लक्ष्य सेनला १-० अशा आघाडीनंतर पराभवाचा सामना करावा लागला.
Lakshya Sen Bronze
Lakshya Sen Bronzeesakal
Updated on

Lakshya Sen Paris Olympic 2024 Bronze Medal Match - भारताचा युवा स्टार लक्ष्य सेन याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला होता. पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत धडक देणारा तो भारताचा पहिला बॅडमिंटनपटू ठरला होता. पण, उपांत्य फेरीतील पराभवानंतर लक्ष्य कांस्यपदक नक्की जिंकेल, असे वाटले होते, परंतु १-० अशा आघाडीनंतरही त्याला हार मानावी लागली. मलेशियाच्या ली जि जियाने भारतीय खेळाडूचे सर्व डावपेच हाणून पाडले आणि त्याला पदकापासून वंचित ठेवले. उजव्या हाताला दुखापत असूनही लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला झुंजवले.

ऐतिहासिक झेप...

ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा लक्ष्य पहिला पुरुष भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. भारताकडून सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहेत. लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या अॅक्सलसन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला आता कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जि जियाविरुद्ध खेळावे लागले.

मलेशियन खेळाडूला सतावले...

लक्ष्य आणि जिया यांच्यात पहिल्या गुणासाठीच जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आणि त्यात सेनने मलेशियन खेळाडूला कोर्टबाहेर फटके खेळण्यास भाग पाडून पहिले दोन गुण घेतले. मलेशियन खेळाडूला लक्ष्य कोर्टवर चांगला पळवताना दिसला आणि त्यामुळे प्रतिस्पर्धीकडून चुका होत राहिल्या. मलेशियन खेळाडू ५-११ असा माघारी पडल्याने दडपणाखाली गेलेला दिसला आणि तो वारंवार कोचकडून मदतीची अपेक्षा करत होता.

लक्ष्यच्या स्मॅशचे मलेशियन खेळाडूकडे उत्तर नव्हते. दोन्ही खेळाडू नेट जवळ अधिक खेळ करण्यावर भर देताना दिसले, परंतु लक्ष्य त्यातूनही स्मॅशची संधी शोधत होता. ती संधी मिळताच तो मलेशियन खेळाडूकडून गुण हिसकावून घेत राहिला. लक्ष्यच्या १६-१० अशा आघाडीने पहिला गेम त्याच्या बाजूने निश्चित केला होता. लक्ष्य सेनने हा गेम २१-१२ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

काँटे की टक्कर

दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यचा हाच झंझावात कायम राहिला आणि त्याने कोर्टवर मलेशियन खेळाडूला नाचवण्याचे सत्र सुरू ठवले. लक्ष्य नेमका कोणत्या दिशेने परतीचा फटका खेळेल याचा अंदाज जियाला बांधणे अवघड होऊन बसलेले.. तो सातत्याने कोर्ट शेजारी बसलेल्या आपल्या प्रशिक्षकांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरील हतबलता प्रकर्षाने जाणवत होती. पण, मलेशियन खेळाडूने गेममध्ये पुनरागमन करताना ८-८ अशी बरोबरी मिळवली. यावेळी लक्ष्यकडून काही चुका झाल्या ज्या मलेशियन खेळाडूच्या पथ्यावर पडल्या. मलेशियन खेळाडूने ११-८ अशी आघाडी घेतली.

विश्रांतीमध्ये लक्ष्यला कोचकडून काही सुचना मिळाल्या आणि त्यांनी मलेशियन खेळाडू बॅकहँडवर खेळवतोय, त्याला तसं करू देऊ नको, असे सांगितले. लक्ष्यने हे ऐकले आणि सलग ४ गुण घेत मॅच १२-१२ अशी बरोबरीत आणली. लक्ष्यचा फोरहँड शॉट्स उल्लेखनीय होता. मलेशियन खेळाडू डोकं वर काढत होता, परंतु लक्ष्यच्या वेगवान स्मॅशचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण, या गेममध्ये मलेशियन खेळाडूचा खेळाचा दर्जा उंचावलेला दिसला आणि त्याने कडवी टक्कर दिली. लक्ष्यच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मार लागलेला आणि त्यातून रक्त वाहत असल्याने त्याला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. मलेशियन खेळाडूने २०-१६ अशा गुणांसह गेम पॉइंट मिळवला आणि त्यानंतर २१-१६ असा गेमही जिंकला.

निर्णायक गेममध्ये कसोटी...

जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला जियो सहजासहजी हार माणण्यास तयार नव्हता आणि दुसऱ्या गेममधील विजयाने ३त्याचे मनोबल उंचावले होते. त्याने तिसऱ्या गेमची सुरुवात जबरदस्त स्मॅश पॉइंटने केली आणि त्यानंतर ३-१ अशी आघाडी घेतली. लक्ष्यकडून पुन्हा एरर झाले आणि मलेशियन खेळाडूची आघाडी ६-२ अशी मजबूत झाली. मलेशियन खेळाडू लक्ष्यच्या शरिरावर परतीचे हल्ले करून गुण कमवत होता आणि त्यामुळे भारतीय खेळाडूचे लक्ष्यही विचलित झालेले दिसले. लक्ष्यने सलग ३ गुण घेताना पिछाडी ५-९ अशी कमी केली.

दुखापतीनं डोकं वर काढलं अन्...

दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेली रॅली प्रेक्षकांची उत्सुकता क्षणोक्षणी वाढवत होती. मलेशियन खेळाडूच्या स्मॅशला लक्ष्यकडून मिळत असलेले उत्तर मलेशियन पाठिराख्यांना हैराण करत होते. लक्ष्यच्या हाताच्या दुखापीतनं पुन्हा डोकं वर काढलं आणि लक्ष्यला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. त्याच्या हाताच्या कोपऱ्यावर पुन्हा एकदा पट्टी बांधली गेली. पट्टी बांधून लक्ष्य कोर्टवर पुन्हा लढण्यासाठी उतरला. मलेशियन खेळाडूने ११-६ अशी आघाडी घेतल्यानंतर लक्ष्यला पुन्हा प्रशिक्षकांकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या. मलेशियन खेळाडूने तिसरा गेम २१-११ घेत कांस्यपदक नावावर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.