India Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. गुरुवारी (८ ऑगस्ट) भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनला २-१ अशा गोलफरकाने विजय मिळवला.
यासह भारताने ५२ वर्षांनंतर सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा विक्रम केला. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्य पदक जिंकले होते. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने आत्तापर्यंत १३ ऑलिम्पिक पदके जिंकली आहे, जो एक विक्रम देखील आहे.
दरम्यान, या विक्रमी विजयानंतर भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत झाले. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील कांस्य पदक विजेता भारतीय संघ शनिवारी (१० ऑगस्ट) पॅरिसहून दिल्लीमध्ये आला. यावेळी विमानतळावर त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले.
यावेळी अनेक चाहते आणि पत्रकार मंडळी तिथे उपस्थित होते. ढोलच्या तालावर भारतीय संघातील काही खेळाडूंनी ठेकाही धरलेला दिसून आला. यावेळी भारतीय खेळाडूंसाठी चोख सुरक्षा व्यवस्थाही केलेली दिसली.