Neeraj Chopra on Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आलं होतं. ती ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.
मात्र अंतिम सामन्याआधी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक भरलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिला सुवर्णपदकासाठी अंतिम सामना खेळताही आला नाही. तिला अपात्र ठरवल्यानंतर तिच्याबरोबर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला अंतिम सामन्यात स्थान देण्यात आले.
यानंतर या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि ज्येष्ठ वकिल हरीश साळवे ही विनेशची बाजू मांडली. तिने तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी विनंती केली आहे. आता या प्रकरणाचा निकाल शनिवारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात अनेकांनी विनेशला पाठिंबा देत धीर दिला आहे. यामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. याचदरम्यान, आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.