Hockey India Olympic 2024 Live : भारताचे ४४ वर्षानंतर फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले! जर्मन्सने 'सुवर्ण' शर्यतीतून बाहेर केले

India vs Gerrmany Hockey Semi Final Live : १९८० मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने शेवटचे गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर हॉकीत ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी भारताला २०२१ पर्यंत वाट पाहावी लागली.
India vs Germany Hockey
India vs Germany Hockeyesakal
Updated on

Hockey - Men's Semi-final India vs Germany Olympic 2024 - हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ एक नवा इतिहास लिहिण्यासाठी मैदानावर उतरला होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने पॅरिसमध्ये पदकाचा रंग सोनेरी करण्याचा निर्धार केला होता. पण, जर्मनीने टोकियोतील पराभवाचा वचपा काढून भारताला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर केले. उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला आणि आता त्यांना कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनविरुद्ध खेळावे लागणार आहे. जर्मन विरुद्ध नेदरलँड्स असा फायनल मुकाबला होईल.

६ पैकी १ पेनल्टी कॉर्नरवर गोल...

भारतीय संघाने टोकियोत कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला पराभूत केले होते आणि आज त्यांनी दुसऱ्याच मिनिटाला कॉर्नर मिळवला. पण, जर्मन्सचा बचाव सुरेख राहिला. हार्दिकने भारताला सलग दोन कॉर्नर मिळवून दिले. तिसऱ्या मिनिटाला हरमनप्रीतचा प्रयत्न जर्मनीने रोखला. ७व्या मिनिटाला भारताला सलग चार कॉर्नर मिळाले आणि त्यापैकी ३ रोखण्यात जर्मन्सना यश मिळवले. पण, हरमनप्रीतने चौथ्या प्रयत्नात गोल केला आणि भारताला ७व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिले क्वार्टर भारतातच्या नावावर राहिले.

जर्मनीची आक्रमक सुरुवात...

जर्मनीकडून बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न होताना दिसले आणि १८ व्या मिनिटाला गोंझालो पेइल्लटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून १-१ अशी बरोबरी मिळवली. जर्मनीचा संघ आता हावी होताना दिसला आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंकडूनही चूका झाल्या. २० व्या व २३ व्या मिनिटाला अनुक्रमे अभिषेक व ललित उपाध्याय यांनी आघाडी मिळवण्याची संधी गमावली. २७व्या मिनिटाला रेफरीने जर्मनीला पेनल्टी स्ट्रोक दिला आणि त्यावर ख्रिस्तोफर रुहरने गोल करून जर्मनीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

कॉर्नरवर गोल करण्यात अपयश..

आघाडीमुळे जर्मनीचे खेळाडू अधिक आक्रमक झाले होते. भारतीयांना चेंडूवर ताबा राखण्यापासून त्यांनी रोखले होते. तरीही ३१ व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर कमावले. सलग दोन कॉर्नवर हरमनप्रीत गोल करण्यात अपयशी ठरला. हरमनप्रीतने मारलेला दुसरा चेंडू जर्मनीच्या गोलरक्षकाने रोखला अन् चेंडू हार्दिक सिंगकडे गेला. डाव्या बाजूने त्याला गोल करण्याची संधी होती, परंतु तो चेंडूला योग्य दिशा देऊ शकला नाही. ३६व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करून भारताला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

शेवटची १५ मिनिटं...

पुन्हा एकदा अम्पायरचे काही निर्णय भारताच्या विरोधात गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत नाराज दिसला. ४६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर जर्मनीने जवळपास आघाडी मिळवलीच होती, परंतु पी आर श्रीजेशने अविश्वसनीय बचाव केला. त्याच्या गोललाईन बचावाने जर्मनीच्या खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केले. ५१व्या मिनिटाला श्रीजेशच्या आणखी एका बचावाने जर्मनीची आघाडी नाकारली. जर्मनीकडून अखेरच्या १० मिनिटांत जबरदस्त खेळ झाला. ५४ व्या मिनिटाला मार्को मिल्टकाऊने अप्रतिम मैदानी गोल करून जर्मनीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. भारताकडून त्यानंतर जोरदार प्रयत्न झाले, परंतु वाट्याला अपयश आले. शेवटची दोन मिनिटं भारत गोलरक्षकाशिवाय खेळला आणि एक कॉर्नरही रोखला. शेवटच्या मिनिटाला भारताने दोन संधी निर्माणही केल्या होत्या, परंतु दुर्दैवं म्हणावं लागेल की भारत २-३ असा हरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.