Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा संपली. भारताच्या नेमबाजांनी ही स्पर्धा गाजवली. नेमबाजीतून भारताला यंदा सर्वाधिक ३ पदकं मिळाली. यातील एक पदक महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने जिंकले. त्यामुळे तब्बल ७२ वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू मिळाला.
स्वप्नीलने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकलं. स्वप्नीलच्या या यशात त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचाही मोठा वाटा राहिला. करियरच्या अगदी सुरुवातीपासून स्वप्नीलला दिपाली यांचं मार्गदर्शन मिळालंय.
विशेष म्हणजे केवळ स्वप्नीलच नाही, तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले अर्जुन बबुता, सिफत कौर, अंजुम मोदगिल हे शूटर्सही त्यांचेच विद्यार्थी आहेत. यातील अर्जुन बबुतानेही १० मीटर एअर रायफलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण तो चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं.
ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्तरावर या खेळाडूंना पोहचवणाऱ्या दिपाली यांच्याशी 'सकाळ' ने मारलेल्या या खास गप्पा...
विद्यार्थांनी मिळवलेलं यश पाहुन प्रशिक्षक म्हणून काय भावना आहेत?
आनंद तर आहेच. कारण खूप वर्षांपासून ही मुलं माझ्याकडे आहे. त्यांच्या माध्यमातूनच मी माझं ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण करतेय, असं म्हटलं तर चुकीचे ठऱणार नाही. मी ज्युनियर टीमची जबाबदारी घेतलेली, तेव्हा ही मुलं माझ्याकडे आली. तेव्हा मी त्यांची प्रतिभा पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की हे यश मिळवू शकतात.
मुळात ज्या ६ मुलांना मी मार्गदर्शन केलंय, ती सर्व मुलं या ऑलिम्पिकशी जोडली गेली. त्यातील ५ जणांनी कोटा जिंकला आणि ४ जणांची भारतीय संघात निवड झाली. यातील स्वप्नीलने तर मेडल जिंकलं आणि अर्जुन बबुताचं थोडक्यात हुकलं; पण हा खेळ आहे, यात जय-पराजय होतो. मात्र, या सर्व अनुभवातून एक जाणीव झाली की आम्ही योग्य मार्गावर आहोत. आता आम्ही पुढच्या ऑलिम्पिकला आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.