Father clarification on Manu-Neeraj marriage rumors: मनू भाकरची आई सुमेधा यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राची भेट घेतली. नेमबाजाची आई आणि नीरज यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनू व नीरजच्या लग्नाच्या पुड्या नेटीझन्सनी सोडल्या. काल दिवसभर सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगलेली दिसली. मंगळवारी मनू भाकरचे वडील, राम किशन भाकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,“ मनू अजून खूप लहान आहे आणि सध्यातरी तिच्या लग्नाचा विचार करत नाही आहोत.”
दैनिक भास्करशी बोलताना ते म्हणाले, “ मनू अजून खूप लहान आहे. तिचे वयही लग्नायोग्य नाही. आत्ता त्याचा विचारही करत नाहीये.” त्यांची पत्नी आणि नीरज चोप्रा यांच्या गप्पांचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. त्यावर राम किशन म्हणाले,“मनूची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते.”
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज मनूने दोन कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. त्यानंतर भालाफेकीत नीरजने रौप्यपदक जिंकले आणि ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गटात सुवर्ण व रौप्य अशी दोन्ही पदकं जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय ठरला.
नीरज चोप्राच्या काकांनीही या अफवांवर खुलासा केला. “नीरजने ज्याप्रमाणे पदक आणले त्याचप्रमाणे संपूर्ण देशाला त्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे, जेव्हा तो लग्न करेल, तेव्हा सर्वांना कळेल,” असे त्याच्या काकांनी सांगितले.