Paris Olympic 2024 : मनूचा ‘वन वुमन शो’ अन् सरबज्योतची अखेरच्या क्षणी चमक; ऐतिहासिक पदकाचा 'लक्ष्य'भेदी थरार

भारताची २२ वर्षीय कन्या मनू भाकर सातासमुद्रापार पॅरिसमध्ये इतिहास घडवताना दिसत आहे. या ‘पिस्तूल क्वीन’ने शूटिंग रेंजवर तीन दिवसांत दोन पदके पटकावताना भारताचा झेंडा ऑलिंपिकमध्ये अगदी दिमाखात फडकवला.
Paris Olympic 2024
Paris Olympic 2024 sakal
Updated on

पॅरिस : भारताची २२ वर्षीय कन्या मनू भाकर सातासमुद्रापार पॅरिसमध्ये इतिहास घडवताना दिसत आहे. या ‘पिस्तूल क्वीन’ने शूटिंग रेंजवर तीन दिवसांत दोन पदके पटकावताना भारताचा झेंडा ऑलिंपिकमध्ये अगदी दिमाखात फडकवला.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल या वैयक्तिक प्रकारात रविवारी ब्राँझपदक पटकावल्यानंतर मनू हिने मंगळवारी सरबज्योत सिंगच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात आणखी एक ब्राँझपदकावर मोहर उमटवली. भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील हे दुसरेच पदक ठरले. स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवणारी ती पहिली खेळाडू ठरली.

मनू भाकर-सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने ब्राँझपदकासाठीच्या लढतीत ली वोनोहो व ओह येह जिन या कोरियन नेमबाजांवर १६-१० असा विजय साकारला. भारतीय नेमबाजांनी आठ सेटमध्ये यश मिळवले, तर कोरियन नेमबाजांना पाच सेटमध्येच विजय मिळवता आले. प्रत्येक विजयी सेटमधून दोन गुणांची कमाई करता येते.

Paris Olympic 2024
Paris Olympic 2024 : इतिहास आणि भविष्य दाखवणारे ऑलिंपिक संग्रहालये

ऑलिंपिकमधील नेमबाजी या खेळातील भारताचे हे सहावे पदक ठरले. नेमबाजीत दोन पदके जिंकणारी मनू ही भारताची पहिलीच नेमबाज ठरली. तसेच, नेमबाजी खेळातील सांघिक विभागात भारताला पहिल्यांदाच पदक पटकावता आले. हरियानाच्या सरबज्योत याने पहिल्याच प्रयत्नात ऑलिंपिकमध्ये पदक पटकावताना संस्मरणीय कामगिरीची नोंद केली. त्याच्या ब्राँझपदकानेही इतिहास रचला.

दृष्टिक्षेपात

- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकावणारी मनू भाकर ही देशाची पहिली खेळाडू ठरली आहे. मनू हिने रविवारी पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ब्राँझपदक पटकावले. आता तिने सरबज्योत सिंगच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.

- पुरुष कुस्तीपटू सुशीलकुमार (बीजिंग २००८, लंडन २०१२) व महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (रिओ दी जेनेरियो २०१६, टोकियो २०२१) या भारतीय खेळाडूंनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकावण्याची किमया करून दाखवली. या यादीत मनू भाकरचाही समावेश झाला आहे. मात्र, मनू भाकर हिने एकाच ऑलिंपिकमध्ये करिष्मा करून दाखवला आहे.

Paris Olympic 2024
Paris Olympic 2024: काय सांगता! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिने 'तलवार' हाती घेतली अन् ऑलिम्पिकमध्ये लढली

- मनू भाकर हिला पॅरिसमध्ये इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. आणखी एका प्रकारात ती देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. २५ मीटर पिस्तूल प्रकारात ती सहभागी होणार आहे. यामध्ये तिने पदक जिंकल्यास ऑलिंपिकमध्ये पदकांची सुवर्ण ऐतिहासिक हॅट्‌ट्रिक तिला साधता येणार आहे.

- दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळात १९००मधील ऑलिंपिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन पदके पटकावली होती. तो ब्रिटन, भारत नागरिक म्हणून ओळखला गेला. मात्र, ऑलिंपिकमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

सुरुवातीला निराशा

मनू भाकर-सरबज्योत सिंग या भारतीय जोडीसमोर ब्राँझपदकासाठीच्या लढतीत कोरियाच्या ली वोनोहो व ओह येह जिन या जोडीचे आव्हान होते. कोरियन जोडीने पहिल्या सेटमध्ये २०.५ गुणांची कमाई केली. भारताला १८.८ गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळे पहिल्या सेटचे दोन गुण दक्षिण कोरियाला मिळाले.

Paris Olympic 2024
Paris Olympic 2024, Day 4: मनू भाकर-सरबज्योतचं विक्रमी मेडल, तर सात्विक-चिराग अन् हॉकी संघाचा दणदणीत विजय; कसा होता चौथा दिवस

मनूचा ‘वन वुमन शो’

मनू भाकर-सरबज्योत सिंग या जोडीने त्यानंतर झोकात पुनरागमन केले. दोन ते पाच या चारही सेटमध्ये पैकीच्या पैकी गुण कमवताना दिमाखदार कामगिरी केली. मनू हिने स्वबळावर भारताला आठ गुणांची कमाई करून दिली. मनू हिने या चारही सेटमध्ये अनुक्रमे १०.७, १०.४, १०.७, १०.५ असे शॉट्‌स मारले. सरबज्योत याने या चारही सेटमध्ये समाधानकारक कामगिरी केली.

नवव्या, दहाव्या सेटमध्ये महत्त्वपूर्ण गुण

पहिल्या आठ सेटपैकी पाचमध्ये भारतीय जोडीने विजय मिळवला, तर तीन सेटमध्ये कोरियाच्या जोडीने यश मिळवले. त्यामुळे नववा व दहावा सेट महत्त्वपूर्ण ठरला. या दोन्ही सेटमध्ये भारतीय नेमबाजांनी बाजी मारली आणि आपली आघाडी १४ पर्यंत नेली. त्यामुळे विजयासाठी फक्त दोन गुणांचीच आवश्‍यकता होती. कोरियन जोडीने ११व्या व १२व्या सेटमध्ये प्रभावी कामगिरी करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला.

सरबज्योतची अखेरच्या क्षणी चमक

मनू भाकर हिने संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजवले. सरबज्योत सिंग दबावाखाली खेळताना दिसला; पण विजयी शॉट खेळण्याची गरज असताना त्याने अचूक निशाणा साधला. १३व्या सेटमध्ये मनू हिला ९.४ गुणांचा शॉट खेळता आला. त्याचवेळी सरबज्योत याने १०.२ गुणांचा शॉट मारला आणि भारताने १९.६ अशी गुणसंख्या नेली. दक्षिण कोरियन नेमबाजांना १८.५ गुणांवरच समाधान मानावे लागले. अखेर भारताने १६-१० असा विजय साकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.