Neeraj Chopra and Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवारी (८ ऑगस्ट) पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी झाली. या फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदकची कमाई केली, तर भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं.
दरम्यान, मैदानात या दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर असली, तरी खेळाच्या मैदानाबाहेर ते चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्रीही अनेकदा दिसून आली आहे. विशेष म्हणजे ज्या अर्शदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं, त्याच्या मदतीसाठी नीरजने काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. नदीमला नवा भाला मिळावा, यासाठी त्याने विनंती केली होती.
मार्च २०२४ मध्ये नदीमने सांगितले होते की तो सात ते आठ वर्षे एकच भाला वापरत आहे आणि आता त्याचा भाला खराब झाला आहे. त्याने राष्ट्रीय फेडरेशनकडे यासाठी मदतही मागितली होती. त्याच्या या खुलास्यानंतर नीरजने नदीमला मदत केली जावी अशी विनंती केली होती. तसेच त्याने असेही म्हटले होते की भाला बनवणाऱ्यांनीही त्याला स्पॉन्सरशीप द्यावी.
यानंतर नदीमला आवश्यक ती मदत मिळाली होती आणि तो पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रमही केला. त्याने अंतिम सामन्यात ९२.९७ मीटर लांब भाला फेकला. हा ऑलिम्पिकमधील सर्वात लांब थ्रो ठरला. यापूर्वी हा विक्रम अँड्रियास थॉर्किलडसेनच्या नावावर होता. त्याने २००८ ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटर लांब भाला फेकला होता.
दरम्यान अंतिम फेरीत नीरजने त्याचा सिजन बेस्ट देत ८९.४५ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले.तसेच ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकला आणि कांस्य पदक पटकावले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की नीरज आणि नदीम गेल्या अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये एकत्र भाग घेतला असून आपापल्या देशांसाठी पदके जिंकली आहेत. नदीमने राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२२ आणि २०२३ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.