Paris Olympic 2024, Rafael Nadal vs Novak Djokovic: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूही सामील झाले आहेत.
टेनिसमधील दोन स्टार खेळाडू नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल हे दोन खेळाडूही या स्पर्धेत खेळत आहेत. दरम्यान, हेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी सोमवारी एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आमने-सामने होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लाल मातीच्या कोर्टवर टेनिसचे सामने खेळवले जात आहेत. या कोर्टवर नदालचा खेळ वर्षानुवर्षे बहरताना दिसला आहे. त्यामुळे त्याला लाल मातीचा बादशाह असंही म्हटलं जातं. मात्र सोमवारी झालेल्या सामन्यात त्याच्यावर सार्बियाच्या नोवाक जोकोविचने वर्चस्व राखलं.
दुसऱ्या फेरीत जोकोविचने स्पेनच्या नदालला ६-१, ६-४ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे एकेरीतून आता नदालचे आव्हान संपले आहे. परंतु, तो कार्लोस अल्काराजबरोबर स्पेनसाठी दुहेरीतही खेळत असल्याने तिथे त्याला पुढे जाण्याची अजूनही संधी आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात पहिल्याच सेटमध्ये जोकोविचने नदालवर सुरुवातीलाच वर्चस्व राखले होते. त्याने आपली सर्व्हिस राखण्याबरोबरच नदालची सर्व्हिस तोडत पहिले पाचही गेम जिंकले होते. मात्र त्यानंतर नदालने पुनरागमन सहावा गेम जिंकला.
मात्र जोकोविचने सातव्या गेममध्ये पहिला सेट नावावर करत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही जोकोविचची सुरुवात भन्नाट झाली होती. त्याच्यासमोर काही दिवसांपूर्वीच कमबॅक केलेल्या नदालला खेळणे कठीण जात होते.
जोकोविचने पहिले चारही गेम जिंकले होते. पण यानंतर नदालने भारी पुनरागमन केलं. त्याने जोकोविच्या सर्व्हिस तोडत सलग ४ गेम जिंकत सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी साधली.
यानंतरही नदालने जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र नंतर पुन्हा जोकोविचने नदालची सर्व्हिस तोडली आणि ५-४ अशी आघाडी घेतली. पुढचा गेमही त्याने जिंकत सामनाही जिंकला आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविच यंदा पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान, नदालने दुहेरीत अल्काराजबरोबर खेळताना पहिल्या फेरीत अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्धालेझ आणि अँद्रे मोल्टेनी या जोडीला ७-६ (६-४), ६-४ अशा फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता त्यांची जोडी दुसऱ्या फेरीत पोहचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.