- स्वदेश घाणेकर
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज होणारा भारत-स्पेन कांस्यपदकाचा सामना एका व्यक्तीसाठी खूप भावनिक आहे... तो लिहितो...
''मी आज शेवटचा पोस्टच्या समोर उभं राहणार आहे... माझं मन अभिमानाने व कृतज्ञतेने भरून आलं आहे. स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुलापासून ते भारताच्या सन्मानाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा हा प्रवास प्रचंड विलक्षण होता.''
''आज मी माझ्या भारतदेशासाठी शेवटचा सामना खेळणार आहे. प्रत्येक बचाव, प्रत्येक डाईव्ह, चाहत्यांकडून दुमदुमणारा प्रत्येक आवाज मी माझ्या हृदयात कायमचा साठवून ठेवणार आहे. माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल, भारताचे आभार... हा शेवट नक्कीच नाही, हा प्रेमळ आठवणींसह जगण्याचा एक सुंदर प्रवास आहे.''
स्वप्नांचा संरक्षक.. जय हिंद!
एव्हाना तुम्हाला समजलं असेल कोणाबद्दल बोलतोय... आपण आतापर्यंत दिग्गज क्रिकटपटू राहुल द्रविड याला 'The Wall' ही पदवी दिली होता. कारण राहुल मैदानावर उभा राहायचा तो, प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण एखाद्या मजबूत भिंती प्रमाणे परतवून लावण्यासाठीच... असाच एक महान खेळाडू निवृत्त होतोय... भारताची अभेद्य भिंत म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ती ओळख स्वतःसोबत कायम घेऊन तो भारतीय हॉकी संघासाठी शेवटचा सामना खेळणार आहे...भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता तो मैदानावर उतरेल, तेव्हा त्याच्या मनातील भावना हॉकी स्टीक्सच्या फटक्यानंतर वेगाने पळणाऱ्या चेंडू सारख्या बाहेर येण्यासाठी सज्ज असतील... पण, इथेही त्या भावनांना रोखण्याचे काम त्याला करावे लागणार आहे... एखाद्यावेळेस प्रतिस्पर्ध्यांना रोखणे त्याच्यासाठी सोपं असेल, पण उचंबळून येणाऱ्या भावनांशी त्याला आज झगडायचे आहे...
पी आर श्रीजेश.... भारतीय संघात एक युवा मलयालम दाखल झाला तेव्हा हिंदी त्याला समजत नव्हती... माझी परिस्थिती तेव्हा एखाद्या मोठ्या महोत्सवात हरवलेल्या श्वानसारखी झाली होती. मला ती भाषा माहीत नव्हती, माझा कोण मित्रही नव्हता. मला माझ्या आवडीचं जेवणंही मिळत नव्हतं. सर्व प्रशिक्षक हिंदीतच बोलत होते, असे श्रीजेशने एका मुलाखतीत सांगितले होते.
२००४ मध्ये श्रीजेश पहिल्यांदा ज्युनियर कॅम्पमध्ये आला होता आणि आज तो दोन दशकानंतर भारताचा महान खेळाडू म्हणून निवृत्त होतोय... त्याचं घरातील कपाट असंख्य ट्रॉफी अन् पदकांनी भरलेलं आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक, आशिया स्पर्धेचं सुवर्ण ( आणि कांस्य), राष्ट्रकुल स्पर्धेचं रौप्य आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची अनेक पदकं त्याच्या नावावर आहेत. आज तो भारतीय संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
तुम्ही तरुण असता तेव्हा तुमच्यातही आळशीपणा असतोच.. तसा तो श्रीजेश मध्ये होता. पळण्याचा प्रचंड कंटाळा येत असल्यामुळे त्याने गोलरक्षक होण्याचे ठरवले. जेव्हा तो हॉस्टेलमध्ये होता आणि तिथेच हॉकी खेळण्यास सुरूवात केली. मैदानाचे ५-६ राऊंड मारून वॉर्म अप व्हायचा आणि त्यानंतर व्यायाम, स्प्रिंट, अन्य सराव, स्टीक्स आणि चेंडूसोबत सराव... इतकं सर्व करून श्रीजेशला आता आपली विकेट पडतेय असेच वाटायचे... त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं की गोलरक्षकाला १-२ राऊंडच मारावे लागायचे आणि नंतर पॅड बांधून कॉर्नरला उभं राहून चेंडूला किक मारण्याचा सराव करायला लागायचा. हे पाहून तरुण श्रीजेशच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्याने गोलरक्षक होण्याचा निर्णय घेतला...
श्रीजेशला सुरुवातीला त्याचा निर्णय स्मार्ट असल्याचे जाणवत होते... केरळमध्ये क्रीडा संस्कृतीत आहे, परंतु हॉकीत तिथे फार कुणाला रस नव्हता. त्यात श्रीजेशने हॉकीची निवड केल्याने पालकांचा विरोध होता. त्याचा चुलत भाऊ व्हॉलिबॉल खेळायचा आणि तो त्याला अरे हॉकीपटूंना सरकारी नोकरी कुठेय...
काही दिवसानंतर श्रीजेशला ग्रेस मार्क विषयी समजले आणि ते मार्क मिळवायचे असतील तर हॉकी हा सोपा मार्ग असल्याचे त्याने शोधले... हॉकी खेळण्याच्या निर्णयावर तो ठाम राहिला. ग्रेस मार्कचा हा जुगाड त्याला यशोशिखरावर पोहोचवणारा ठरला.
२००४ ते २०२४ या कालावधीत श्रीजेशने भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले. २०२०-२१ मध्ये त्याने जगातिल सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार जिंकला. २०१४ च्या आणि २०२२च्या आशियाई सुवर्णपदक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. २०१७ मध्ये त्याला पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
८ मे १९८८ मध्ये कोचीनजीक किझाक्कमबालम येथे जन्मलेला खेळाडू ३६ वर्षांनंतर भारताच नायक बनला आहे. पी व्हीह रविंद्रम आणि उषा या शेतकरी कुटुंबातील त्याचा जन्म... त्यामुळे परिस्थिती गंभीर अन् आपण खंबीर, हे बाळकडू त्याने लहानपणीच प्यायले होते. त्याच जोरावर तो इतकी वर्ष भारतीय हॉकी संघात तग धरून उभा राहिला आणि अनेक अविस्मरणीय विजय मिळवून भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला...
पी आर श्रीजेशच्या कारकीर्दिची सुरुवात काही चांगली झाली नव्हती आणि त्याला राखीव गोलरक्षक म्हणून खेळवले जायचे... पण, २०११च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने वाचवलेल्या पेनल्टी स्ट्रोकने त्याला हिरो बनवले. त्यानंतर तो संघाचा नियमित सदस्य बनला.. त्याने त्याच्या गोलरक्षकाच्या कौशल्यावर आणि चपळाईवर खूप मेहनत घेतली. २०१३च्या आशिया चषक विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याचा हा यशाचा आलेख नंतर चढाच राहिला...
त्याने खेळलेल्या २७० सामन्यांपैकी भारताने १४० लढती जिंकल्या आहेत आणि ५४ बरोबरीत सोडवल्या आहेत. ७६ पराभव या कालावधीत भारताला पाहायला मिळाले. २३ शूट आऊटमध्ये त्याचा विजयाचा दर हा ५६.५% इतका राहिला आहे.
( वरील आकडेवारी २०१३ पासूनची आहे. श्रीजेशने पदार्पण २००४ या वर्षी केले असल्याने प्रत्यक्ष आकडेवारीत बदल असू शकतो. Source: https://www.fih.hockey/datahub/shoot-outs )
''एक गोलरक्षक म्हणून तुम्हाला नेहमी सतर्क रहावे लागते. गोल वाचवला जातो तेव्हा तुम्हाला डोक्यावर घेतले जाते आणि एखाद्यावेळेस अपयश आल्यावर आपटलेही जाते. अशावेळी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एखादो गाल वाचवला, तर तो त्याक्षणी विसरून पुढच्या आव्हानासाठी वर्तमानकाळात येणं महत्त्वाचे असते,'' असे पी आर श्रीजेशने सांगितले होते. गोलक्षरण करताना दुखापतीची भीती असतेच... वेगाने येणारा चेंडू कधी तुम्हाला गंभीर जखम देऊन जाईल हे सांगणे अवघड आहे.
श्रीजेश तू आज निवृत्त होत आहेस, परंतु भारतीयांच्या मनात तू कायम राहशील... तुझ्या पुढील इनिंगसाठी शुभेच्छा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.