-रोहिणी गोसावी
Paris Olympic 2024 : ऑलिंपिक स्पर्धा हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि त्यातील पदके म्हणजे खेळातला सर्वोच्च सन्मानच! खेळाडूंची ती आयुष्यभराची कमाई. त्यामुळं सगळ्यांचंच लक्ष ऑलिंपिकच्या पदकांकडे असतं. यजमान देश पदके बनवताना त्यात काहीतरी नवीन बनविण्यावर लक्ष केंद्रित करत असतो.
कारण जगभरात खेळाडू यजमान देशात मिळालेली आठवण अभिमानानं मिरवत असतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधणारं फ्रान्स प्रशासन याही बाबतीत मागे नाही. पॅरिस ऑलिंपिकसाठी बनवण्यात आलेली पदके ही अतिशय वेगळी आणि खास आहेत.
फ्रान्सच्या सर्वात अमूल्य धातूचा वापर ही पदके बनवताना करण्यात आलाय आणि तो धातू म्हणजे फ्रान्सची ओळख असलेल्या आयफेल टॉवरचं लोखंड! पॅरिस ऑलिंपिकच्या प्रत्येक पदकासोबत प्रत्येक खेळाडू जणूकाही आयफेल टॉवरच त्याच्यासोबत घेऊन जाणारेय.
होय, पॅरिस ऑलिंपिकच्या गोल पदकावरचा षटकोन हा आयफेलच्या लोखंडी चुऱ्याापासून बनवण्यात आलाय. आयफेल टॉवरची डागडुजी करताना बऱ्याचदा त्याच्या ढाच्याचं लोखंड साफ करण्यात येतं. त्यातून त्याचा मोठ्या प्रमाणात चुरा निघतो. याच चुऱ्याचा वापर करून ऑलिंपिकची पदके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळं या पदकांना वेगळं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय.
पॅरिस ऑलिंपिक हे अनेक गोष्टींसाठी वेगळं ठरणार, असं ते जाहीर झाल्यापासून बोललं जातंय. फ्रेंच प्रशासनानं हे तत्त्व तंतोतंत पाळलं असल्याची जाणीव वेळोवेळी होतेय. कारण स्पर्धांच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि अनेक गोष्टींमध्ये तो यशस्वीही झालाय. त्यामुळं पॅरिस ऑलिंपिकची मेडल्स ही आकर्षणाचा विषय आहेत.
ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पदके एखाद्या दागिन्यांच्या कंपनीकडून तयार करून घेण्यात आलीत. फ्रान्सची लक्झरी ज्वेलरी कंपनी लुई व्हितॉ यांच्या ‘शॉमे’ या कंपनीनं ही मेडल्स डिझाईन केलीत.
गेली अनेक वर्षे ऑलिंपिकला पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनवण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. त्याचाच भाग म्हणून ऑलिंपिक पदके पुनर्वापर होणाऱ्या वस्तूपासून बनवण्यात येतात. २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये हा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला होता, तेव्हा त्या पदकांना काही प्रमाणात रिसायकल करता येईल, असं बनवण्यात आलं होतं.
त्यानंतर २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये पूर्णपणे रिसायकल होतील, अशी पदके बनवण्यात आली होती, तीच परंपरा पुढे सुरू ठेवत पॅरिस ऑलिंपिकमध्येही आयफेल टॉवरचा भाग असलेला षटकोन सोडला, तर संपूर्ण रिसायकल होईल, अशी पदके बनवण्यात आली आहेत.
गोल आकाराच्या पदकांना आणखी आकर्षक आणि फ्रेंच बनविण्यासाठी त्यावर आयफेल टॉवरचा चुरा वापरून जो षट्कोनी आकार बनवण्यात आलाय त्याला इंग्रजीत ‘हेक्झागोन’ म्हणतात आणि फ्रान्सलाही ‘द हेक्झागोन’ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं आयफेल आणि फ्रान्सचं नाव अशा दोन्ही गोष्टी या मेडल्समध्ये समाविष्ट करण्यात आल्यात.
ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पॅरालॉम्पिक स्पर्धेच्या पदकांवर ब्रेल लिपीचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून अंध खेळाडूंना पदके अनुभवता यावीत, स्पर्धांच्या पदकावर ‘पॅरिस २०२४’ असं ब्रेल लिपीत लिहिण्यात आलंय. ब्रेल लिपीचा शोध लावणाऱ्या लुई ब्रेल यांना ही एक प्रकारची श्रद्धांजली आहे, असंही समजलं जातंय.
पदकाच्या मागच्या बाजूला ग्रीक विजयाची देवता आणि ऑलिंपिकच्या रिंग्ज बघायला मिळतात, तर पॅरालॉम्पिकच्या मेडल्सवर आयफेल टॉवरचा आकार तयार करण्यात आलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.