Paris Olympic 2024, Day 4: मनू भाकर-सरबज्योतचं विक्रमी मेडल, तर सात्विक-चिराग अन् हॉकी संघाचा दणदणीत विजय; कसा होता चौथा दिवस

India in Paris Olympic Day 4: चौथ्या दिवशी भारताच्या खात्यात दुसऱ्या पदकाची भर पडली. पण असं असलं तरी भारतासाठी हा दिवस कडू-गोड क्षण देणारा राहिला. एकूण या दिवशी काय काय घडलं, याचा घेतलेला आढावा.
India in Paris Olympic Day 4
India in Paris Olympic Day 4Sakal
Updated on

India in Paris Olympic 2024 Day 4 results: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथा दिवस मंगळवारी संपला. भारतासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. खरंतर १२ वर्षांनंतर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत.

दोन दिवसापूर्वी नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं होतं. आता मंगळवारी तिने सरबजोत सिंगसह निशाणा साधताना दुसरं कांस्य पदक जिंकलं. दरम्यान, मंगळवारी भारताला दुसरं पदक मिळालं असलं, तरी काही कडू क्षणही पाहायला लागले. एकूणच चौथ्या दिवशी काय काय घडलं जाणून घेऊ.

India in Paris Olympic Day 4
Manu Bhaker Paris Olympics 2024 : मनुने जिंकलं दुसरं ब्राँझ! १२४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी; सरबजोत सिंहसह ऐतिहासिक कामगिरी

नेमबाजी

मंगळवारी मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंगने कोरियाविरुद्ध कांस्यपदकाचा सामना खेळला आणि जिंकला. यामुळे भारताच्या खात्यात दुसरं पदक आलं.

मनू भाकरचं हे पॅरिस ऑलिम्पिकमधलं दुसरं पदक ठरलं. त्यामुळं ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली.

याशिवाय मंगळवारी पुरुषांच्या ट्रॅप क्वालिफायर्सचा दुसरा दिवस होता. मात्र या प्रकारात भारताच्या पृथ्वीराज तोंडईमनला २१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतूनही बाहेर झाला.

तसेच महिलांच्या ट्रॅप क्वालिफायर्सचा हा पहिला दिवस होता. यात भारताची राजेश्वरी कुमारी २१ व्या, तर श्रेयसी सिंग २२ व्या क्रमांकावर राहिली.

रोइंग

रोइंगमधील पुरुषांच्या एकेरी स्कल प्रकारात भारताचा बलराज पनवार स्पर्धेत उतरला होता. मात्र तो मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत 07:05.10 सेकंद वेळ नोंदवत पाचव्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याला उपांत्य फेरी गाठता आली नाही.

तो आता पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. परंतु, त्याचं स्थान निश्चित करण्यासाठी तो ३१ जुलैला पदकांच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या स्पर्धकांशी शर्यत करेल.

तिरंदाजी

तिरंदाजीत भारताची कामगिरी संमिश्र झाली. भजन कौरने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात राऊंड ऑफ ६४ मध्ये साफिया कमलविरुद्ध ७-३ असा विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर तिने विओलेता म्हैजोरविरुद्ध ६-० ने विजय मिळवला आणि अव्वल १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे. मात्र, याच प्रकारात भारताची अंकिता भकत हिचं आव्हान संपुष्टात आलं. तिला राऊंड ऑफ ६४ मध्ये विओलेता म्हैजोरनेच ४-६ अशा फरकाने पराभूत केलं होतं.

त्याचबरोबर धीरज बोम्मादेवरा यालाही पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात अव्वल १६ मध्ये स्थान मिळवण्यात थोडक्यात अपयश आलं. त्याने राऊंड ऑफ ६४ ऍडम लीविरुद्ध ७-१ ने विजय मिळवला होता. मात्र राऊंड ऑफ ३२ मध्ये एरिक पिटर्सविरुद्ध ५-५ अशी बरोबरी झाल्यानंतर शूटऑफ झाले. पण बाण सोडल्यानंतर त्याच्या आणि एरिकच्या बाणाच्या अंतरात अवघ्या २.४ सेंटीमीटरचा फरक असल्याने धीरजला या स्पर्धेतून बाहेर जावे लागले. त्यामुळे तो पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाला.

हॉकी

मंगळवारी भारतीय हॉकी संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध झाला.या सामन्यात भारताने आयर्लंडवर पूर्ण वर्चस्व राखल्याचं दिसलं. या सामन्यात पहिल्या हाफमध्येच कर्णधार हरमनप्रीत कौरने दोन पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. मात्र दुसऱ्या हाफमध्ये भारताला गोल करता आला नाही, पण भारताने गोल होऊ देखील दिले नाहीत. त्यामुळे हा सामना भारताने २-० अशा फरकाने जिंकला. या विजयासह भारत बी ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर गेला आहे. भारताचे आता ७ गुण आहेत. याशिवाय भारतानं या विजयासह आता पुढच्या फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

बॅडमिंटन

बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सी ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर आले आहेत. त्यांनी मंगळवारी इंडोनेशियाच्या फझर अल्फियन आणि रियान मुहम्मद अर्डिआंतो या जोडीला २१-१३, २१-१३ अशा फरकाने पराभूत केले. दरम्यान, सात्विक आणि चिराग यांच्या जोडीने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे.

मात्र, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्तो यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आले आहे.अश्विनी - तनिषा यांना मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या सेत्याना मापासा आणि अँजेला यू या जोडीने १५-२१, १०-२१ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे ग्रुप सी मध्ये अश्विनी आणि तनिषा यांची जोडी सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिली.

बॉक्सिंग

बॉक्सिंगमध्येही भारतासाठी मंगळवार फारसा दिलासादायक ठरला नाही. पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत अमित पांघलला झाम्बियाच्या पॅट्रिक चिन्येम्बाविरुद्ध ४-१ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच महिलांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या जास्मिन लॅब्मोरियाला राऊंड ऑफ ३२ मध्ये नेस्थी पेटेसिओने ५-० फरकाने पराभूत केले.

यानंतर महिलांच्या ५४ किलो वजनी गटात भारताच्या प्रीती पवारलाही रोमांचक लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या येनी मार्सेलाने ३-२ अशा फरकाने पराभूत केले.

त्यामुळे मंगळवारी अमित पांघल, जास्मिन लॅम्बोरिया आणि प्रीती पवार या तिघांचेही आव्हान संपुष्टात आले.

Chitra kode:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.