India in Paris Olympic 2024 Day 5 results: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील पाचवा दिवस म्हणजेच बुधवारचा दिवस भारताच्या महिला खेळाडूंच्या नावावर राहिला, असं म्हणायला हरकत नाही.
बुधवारी पीव्ही सिंधू, लवलिना बोर्गोहेन, श्रीजा अकुला, दिपीका कुमारी अशा महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. याशिवाय महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनेही भारतीयांना पदकाचे स्वप्न दाखवले आहे. एकूणच पाचवा दिवस भारतीयांसाठी कसा राहिला याचा आढावा घेऊ.
नेमबाजीत बुधवारी स्वप्नील कुसळेने चमकदार कामगिरी केली. त्याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराची अंतिम फेरी गाठली आहे. तो या प्रकारात झालेल्या पात्रता फेरीत ७ व्या क्रमांकावर राहिला.
मात्र याच प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर याला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाद झाला.
याशिवाय महिला ट्रॅपचा बुधवारी दुसरा दिवस होता. मात्र या प्रकारात राजेश्वरी कुमारी २२ व्या क्रमांकावर राहिली, तर श्रेयसी सिंग २३ व्या क्रमांकावर राहिली.
बुधवारी बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी शानदार कामगिरी केली. सिंधूने इस्तोनियाच्या क्रिस्तीन क्युबाला २१-५, २१-१० अशा फरकाने पराभूत केले.
तसेच लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीला २१-१८, २१-१२ अशा फरकाने पराभूत केले, तर एचएस प्रणॉयने व्हिएतनामच्या डक फॅट ली याला १६-२१, २१-११, २१-१२ अशा तीन गेममध्ये पराभूत केले.
या विजयांसह सिंधू, लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय या तिघांनीही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता ते बाद फेरीत खेळतील. विशेष म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यातच सामना होणार आहे.
भारताचा रोवर बलराज पनवार यापूर्वीच पुरुष एकेरी स्कल प्रकारात पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाला होता. पण त्याचं या प्रकारातील स्थान निश्चित होण्यासाठी बुधवारी सेमीफायनल C/D शर्यत झाली. यामध्ये तो ६ व्या क्रमांकावर राहिला. आता तो फायनल D मध्ये खेळणार आहे. ही शर्यत २ ऑगस्टला होणार आहे.
ड्रेसेज वैयक्तिक ग्रँड प्रिकस प्रकारात भारताचा अनुश अगरवाल्ला ग्रुप ई मध्ये ९ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. या प्रकारात प्रत्येक ग्रुपमधून दोनच खेळाडू आणि त्याव्यतिरिक्त सर्वोत्तम स्कोअर असणारे ६ खेळाडू पुढच्या फेरीत जाणार होते. अनुश अगरवाल्ला ६६.४४४ स्कोअर झाला.
टेबल टेनिसमध्ये २६ टेबल टेनिस खेळाडू श्रीजा अकुला सिंगापूरच्या जियान झेंग हिच्याविरुद्ध ४-२ च्या फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे आता ती उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचली. ती ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचणारी मनिका बत्रानंतरची दुसरीच भारतीय खेळाडू ठरली.
परंतु, बुधवारी रात्री उशीरा तिला लगेचच तिला उपउपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्युन यिंग्शाविरुद्ध ४-०ने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे तिने एकेरीतील आव्हान संपलं. विशेष म्हणजे बुधवारी तिचा २६ वा वाढदिवस होता.
याशिवाय मनिका बत्राचही एकेरीतील आव्हान बुधवारी संपलं. तिला उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या म्यू हिरानो विरुद्ध १-४ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
बॉक्सिंगमध्ये बुधवारी भारताची स्टार खेळाडू लवलिना बोर्गोहेन उतरली होती. तिने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेच्या सुनिवा हॉफस्टडविरुद्ध ५-० असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता ती पदक निश्चित करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
इतकंच नाही, तर पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटात भारताच्या निशांत देवनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत जोस गॅब्रिएल रोड्रिगेझ टेनोरिओ विरुद्ध ३-२ असा विजय मिळवला. आता तो देखील पदक निश्चित करण्यापासून एक पाऊल दूर आहे.
तिरंदाजीत भारताची अनुभवी महिला खेळाडू दिपीका कुमारीची शानदार कामगिरी राहिली. तिने राऊंड ऑफ ६४ मध्ये रिना पर्नात हिला शूट ऑफमध्ये पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
त्यानंतर तिने राऊंड ऑफ ३२ मध्ये क्विंटी रोफेन हिला ६-२ अशा फरकाने पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ती महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी भजन कौरनंतरची दुसरी तिरंदाज आहे.
मात्र भारताचा अनुभवी तिरंदाज तरुणदीप राय याचं आव्हान लवकर संपलं आहे. त्याला पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीत राऊंड ऑफ ६४ मध्येच ग्रेट ब्रिटनच्या टॉम हॉलविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत ६-४ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.