Paris Olympic 2024; first olympic gold medal after independence: १९२८ ते १९३६ या कालावधीत भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ३ सुवर्णपदकं जिंकली होती. हॉकी अन् सुवर्णपदक हे समिकरण घट्ट झाले होते आणि भारतासमोर कोणाचाही निभाव लागणे अशक्य अशीच परिस्थिती होती. पण, १९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य झाला आणि त्याच दरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीने सर्व चित्र बदलले... १९३६ च्या सुवर्णपदक विजेत्या संघातील बरेच खेळाडू पाकिस्तानला गेले. त्यामुळे १९४८ मध्ये युवा खेळाडूंचा संघ ऑलिम्पिकला लंडनमध्ये गेला अन् देशाला स्वातंत्र्यानंतरचे पहिले Gold जिंकून दिले.
ब्रिटीश सरकार उखडून टाकून भारताने स्वातंत्र्य मिळवले होते आणि पुढच्याच वर्षी त्याच ब्रिटनमध्ये ऑलिम्पिक खेळण्यासाठी भारतीय सज्ज झाले होते. भारताचे ७९ खेळाडू १० क्रीडा प्रकारांच्या विविध ३९ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनच्या वेम्बली पार्क येथे दाखल झाले. पण, मागील तीन ऑलिम्पिकमध्ये हॉकीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघातील बरेच दिग्गज पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे १९४८ मध्ये युवा खेळाडूंची फळी तयार केली गेली आणि त्यात मुंबईतील ८ खेळाडूंचा समावेश होता.
भारतीय हॉकी संघ आपली मक्तेदारी कायम राखेल का, अशी चिंता अनेकांना वाटत होती. फाळणीनंतर अनेक खेळाडू पाकिस्तानात गेले. त्यामुळे भारतासमोर ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान हा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिला होता. १९४८ च्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार अली शाह दारा होता, ज्याने १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण, भारताच्या युवा संघाने आमच्या मक्तेदारीला हात लावणं सोपं नाही, हे दाखवून दिले.
भारताला अ गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रीया व स्पेन यांच्या आव्हानाचा सामना करायचा होता. ब गटातूत ग्रेट ब्रिटन व क गटातून पाकिस्तान टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी डोळे वटारून होते. पण, भारताच्या युवा खेळाडूंनी त्यांचा 'जोश हाय' असल्याचे दाखवून दिले. भारताने पहिल्याच साखळी सामन्यात ऑस्ट्रीयाचा ८-० असा धुव्वा उडवला. पॅट यान्सेन यांनी ३, कुंवर दिग्विजय सिंग यांनी २, तर किशन लाल व रेजिनाल्ड रॉड्रिग्ज यांनी प्रत्येकी १ गोल केले. दुसऱ्या सामन्यात बलबीर सिंग सीनियर यांचा दबदबा पाहायला मिळाला आणि त्यांच्या सहा गोल्सच्या जोरावर भारताने ९-१ अशा फरकाने अर्जेंटिनाचा धुव्वा उडवला.
तिसऱ्या साखळी सामन्यात स्पेनवर २-० असा पराभव करून भारत उपांत्य फेरीत टेबल टॉ़पर म्हणून पोहोचला. क गटातून दुसरे स्थान पटकावणाऱ्या नेदरलँड्सचे आव्हान त्यांच्यासमोर होते. अटीतटीच्या या सामन्यात यान्सेन व कुनवर सिंग यांनी प्रत्येकी १ गोल करून भारताला २-१ असा विजय मिळवून दिला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रेट ब्रिटनने २-० अशा फकराने पाकिस्तानला नमवले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत आणि ग्रेट ब्रिटन समोरासमोर आल्याने सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
ब्रिटनला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर तसे सोपे नव्हते, परंतु भारताच्या यंग ब्रिगेडने हे आव्हान लिलया पेलले. भारताने अंतिम फेरीत यजमान ब्रिटनला ४-० ने पराभूत करून हॉकीमध्ये सलग चौथे सुवर्णपदक जिंकले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंगा डौलाने फडकवण्याची ही पहिलीच वेळ होती.
फायनलच्या सुरुवातीच्या शिटीपासून टीम इंडियाने हाऊसफुल स्टेडियमवर कल्पक मिडफिल्ड आणि हाय-टेम्पो विंग खेळाचे ७० मिनिटे प्रदर्शन दाखवले आणि भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिला मोठा विजय मिळवून दिला. १५ सदस्यीय संघात कर्णधार किशन लालसह मुंबईचे तब्बल आठ खेळाडू होते. लेस्ली क्लॉडियस , केडी सिंग 'बाबू', केशव दत्त, रंगनाथन फ्रान्सिस आणि रणधीर सिंग जेंटलसारखे हॉकीतील जादूगारही होते. तरुण बलबीर सिंग सीनियरने ही स्पर्धा गाजवली. त्यानंतर बलबीर हे १९५२ (हेलसिंकी) आणि १९५६ (मेलबर्न) मधील पुढील दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या संघाचा भाग होते.
१९४८ ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघ: किशन लाल (कर्णधार), रंगनाथन फ्रान्सिस, लिओ पिंटो, वॉल्टर डिसूझा, तरलोचन सिंग बावा, अख्तर हुसेन, रणधीर सिंग जेंटल, कुंवर दिग्विजय सिंग, केशव दत्त, अमीर कुमार, मॅक्सी वाझ , लेस्ली क्लॉडियस, बलबीर सिंग, पॅट्रिक यान्सेन, लतीफुर रहमान, लॉरी फर्नांडिस, जेराल्ड ग्लॅकन, रेजिनाल्ड रॉड्रिग्स, ग्रहनंदन सिंग, जसवंत सिंग राजपूत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.