Paris Olympic IND vs GRB Live Hockey - भारत-ग्रेट ब्रिटन यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. ४३ मिनिटं १० खेळाडूंसह खेळूनही टीम इंडियाने कडवी टक्कर दिली आणि १-१ अशा बरोबरीमुळे मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. ग्रेट ब्रिटनच्या आक्रमणासमोर पी आर श्रीजेश ( PR Shreejesh) भारतासाठी ढाल बनून उभा राहिला. भारताने हा सामना शूट आऊटमध्ये जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतानं उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात केली होती.
भारताला १७व्या मिनिटाला अमित रोहिदासला ( Amit Rohidas) रेड कार्डमुळे उर्वरित सामन्यात १० खेळाडूंसह ग्रेट ब्रिटनला टक्कर द्यावी लागली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ( Harmanpreet Singh) पुन्हा गोल करून भारताला आघाडीवर ठेवले. २२ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी ब्रिटनच्या गोटात गोंधळ निर्माण केला आणि पण, गोलरक्षकाच्या पॅडच्या खाली चेंडू दबल्याने भारतीय खेळाडूंना गोल करता आला नाही. मात्र, कॉर्नर मिळवण्यात यश आले. त्यावर हरमनप्रीत सिंगने भन्नाट स्ट्रोक खेळून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, २७व्या मिनिटाला मॉर्टन ली याने अप्रतिम मैदानी गोल करून ब्रिटनला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
उर्वरित दोन क्वार्टरमध्ये भारताच्या खेळाडूंनी अविश्वसनीय बचाव केली. त्यांनी ग्रेट ब्रिटनचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. ग्रेट ब्रिटनने पहिला प्रयत्न घेतला आणि जेम्स एलबेरीने गोल केली. त्याला भारताच्या हरमनप्रीत सिंगने बरोबरीचा गोल करून उत्तर दिले. झॅच वॅलासेने ग्रेट ब्रिटनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
ग्रेट ब्रिटनच्या चाहत्यांनी भारतीयांना चिडवण्याचा खेळ सुरू केला, परंतु सुखजीत सिंगने त्याकडे दुर्लक्ष करून भारताला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. पण, त्यानंतर ग्रेट ब्रिटनच्या विलियम्सन कोनोरचा प्रयत्न चुकला आणि त्यानंतर ललित उपाध्यायने गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. ग्रेट ब्रिटनच्या रोपर फिलिपचा प्रयत्न श्रीजेशने रोखून भारताची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली होती आणि त्यानंतर राज कुमार पालने गोल करून त्यावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना १-१ ( ४-२ ) असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळलेल्या १० पैकी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे. या नऊ सामन्यांत भारताने सर्वाधिक २१ गोल्स केले होते आणि ब्रिटनला ४ विजयांसह १४ गोल करता आले होते. भारताने १९४८ ची फायनल, १९५२ व १९६० ची उपांत्य फेरी आणि १९७२ ( ५-०) साखळी फेरीत ग्रेट ब्रिटनला नमवले. त्यानंतर ८८, ९२, ९६ व २००० असे सलग चार पराभव भारताला पत्कराव लागले होते. ही मालिका मागच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने मोडली आणि उपांत्यपूर्व फेरीत ३-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर आज ऐतिहासिक विजय मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.