Paris Olympic 2024 Live India Team India Hockey: मागील ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदकाचे गोल्डमध्ये रुपांतर करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पुरुष हॉकी संघाने पॅरिसमध्ये सुरुवात रोमहर्षक केली. न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने ५९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकच्या जोरावर ३-२ असा जिंकला होता. पण, ब गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात अर्जेंटिनाने कडवी टक्कर दिली. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात आलेले अपयश पुन्हा भारताला महागात पडताना दिसले आणि ५९व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने केलेल्या गोलने भारतीय संघाला वाचवले.
बलाढ्य किवींना पराभूत केल्यानंतर ब गटात आज त्यांच्यासमोर अर्जेंटिनाचे आव्हान होते. पहिल्या १५ मिनिटांच्या शेवटच्या पाच मिनिटांत भारतीय खेळाडूंनी अर्जेंटिनाच्या क्षेत्रात वर्चस्व राखले होते. भारताने १०व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु तो घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग मैदानावर नव्हता. तो बाहेर का बसलेला याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. भारताने हा कॉर्नर गमावला, परंतु खेळाडूंनी अप्रतिम वन टच पास खेळून अर्जेंटिनाला हैराण केले होते.
अभिषेकच्या रिव्हर्स हिटने चेंडूला गोलजाळीच्या दिशेने पाठवले, परंतु चेंडू क्रॉसबारवर आदळून माघारी फिरला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड स्टेडियममध्ये उपस्थित होता. अर्जेंटिनाला पहिल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली होती. १८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत तो घेण्यासाठी मैदानावर होता. पण, त्याचा थेट प्रयत्न गोलरक्षकाच्या पायावर गेला. मात्र, पुन्हा सलग दोन कॉर्नर मिळाले आणि अर्जेंटिनाने चांगला बचाव केला.
भारताला अपयश येत असताना अर्जेंटिनाला पहिले यश मिळाले आणि लुकास मार्टिनेझने ( २३ मि.) अप्रतिम गोल केला. आता भारतावर दडपण वाढलेले दिसले. पेनल्टी कॉर्नरच्या संधीवर गोल करण्यात येत असलेले अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरतेय. त्यात अर्जेंटिनाचा गोलरक्षक टॉमस सँटिआगोने भक्कम बचाव भारताला हैराण करताना दिसला. ३७व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी स्ट्रोकची आयती संधी मिळालेली, परंतु माईको कॅसेलाने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेला. भारतीय खेळाडूंनी उसासा सोडला. ४४व्या मिनिटाला मिळेला कॉर्नर पुन्हा भारताने गमावला.
अर्जेंटिनाने बचाव भक्कम राखताना भारताला संधीच दिली नव्हती. भारताचे सर्व प्रयत्न अर्जेंटिनाकडून हाणून पाडले जात होते आणि खेळाडूंवरील दडपणही वाढले. ५ मिनिटे शिल्लक असताना भारताने गोलरक्षक पी आर श्रीजेश याला माघारी बोलावले आणि पूर्ण ११ खेळाडू बरोबरीचा गोल करण्यासाठी मैदानावर उतरवले. ५८व्या मिनिटाला भारताला आधी रेफरीने पेनल्टी स्ट्रोक दिले, परंतु रिव्ह्यूत त्याचे रुपांतर कॉर्नरमध्ये केले गेले. सलग ३ प्रयत्नानंतर अपयशानंतर चौथ्या कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने ( ५९ मि.) गोल करून भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ऑलिम्पिक स्पर्धेतील इतिहासातील भारत-अर्जेंटिनाचा हा दुसरा ड्रॉ राहिला. ( २००४ मध्ये २-२ अशी बरोबरी )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.