Swapnil Kusale: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा भारताच्या नेमबाजांनी गाजवली. भारतीय नेमबाजांनी पहिल्यांदाच एका ऑलिम्पिक स्पर्धेत तीन पदके जिंकण्याचा कारनामा केला. यामध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेचाही समावेश आहे.
स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. त्यानंतर त्याचे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातून कौतुक करण्यात आले. तो खशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा खेळाडू ठरला.
दरम्यान, या यशानंतर प्रथमच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईमध्ये नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्याला उपरणे देऊन गौरवान्वित केले.