बंगळूर : पॅरिस ऑलिंपिक हे माझे चौथे व अखेरचे ऑलिंपिक असणार आहे, असे उद्गार भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य मनप्रीत सिंग याने याप्रसंगी काढले. मनप्रीत सिंग पीटीआय संस्थेशी संवाद साधताना म्हणाला, मी अजून निवृत्तीचा विचार केलेला नाही, पण पॅरिस हे माझे अखेरचे ऑलिंपिक असेल असे समजूनच मी मैदानात उतरणार आहे.
माझे संपूर्ण लक्ष्य पॅरिस ऑलिंपिकवर असणार आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायचे. पदक जिंकायचे. हे सर्व खेळाडूंचे स्वप्न असते. मी चौथे ऑलिंपिक खेळतो आहे. त्याचमुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
मनप्रीत सिंग याच्या कुटुंबीयांना हलाखीच्या दिवसामधून जावे लागले आहे. वडील कारपेंटर म्हणून दुबईत कामाला होते, पण वैद्यकीय समस्या उद्भवल्यामुळे त्यांना मायदेशी परतावे लागले. आई घर सांभाळायची. दोन भाऊही हॉकी खेळत होते, पण आर्थिक विवंचनेमुळे त्यांना या खेळापासून दूर रहावे लागले. अशा परिस्थितीवर मनप्रीत याने मात केली.
भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक जोर्द मरीन यांनीही मनप्रीत सिंग याच्यावर आरोप करताना म्हटले की, मनप्रीत याने संघातील इतर खेळाडूंवर सुमार कामगिरी करण्याचा दबाव टाकला. जेणेकरून २०१८ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याच्या मित्रांना भारतासाठी खेळता येईल. या आरोपाबद्दल मनप्रीत म्हणाला, तो काळ अत्यंत वाईट होता. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हा माझा जवळचा मित्र होता. त्याला याबाबत सर्व काही सांगितले. आईने यामधून सावरण्यासाठी बळ दिले.
- २०११ मध्ये १९व्या वर्षी पदार्पण
- टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ
- २०१४ व २०२२ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण
- मनप्रीत एम. एस. धोनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो व डेव्हिड बेकहॅम यांचा चाहता आहे. अन् याच कारणामुळे सात क्रमांकाची जर्सी परिधान करतो.
मनप्रीत सिंग पॅरिस ऑलिंपिकमधील स्पर्धेबाबत म्हणाला, आमच्या गटात एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक लढतीत सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. विश्वकरंडकात न्यूझीलंडकडून आमचा पराभव झालेला आहे. आयर्लंडने बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.