Paris Olympic 2024 Pregnant Yaylagul Ramazanova : इजिप्तची नदा हाफेझ सात महिन्यांची गरोदर असूनही ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत खेळली... जगभरात तिचे कौतुक झाले, तर काहींनी टीकाहीह केली. पण, हाफेजप्रमाणेच अझरबैजानची तिरंदाज यायलागूल रमाझानोव्हा ही साडेसहा महिन्याची गरोदर आहे आणि तिने एक मजेशीर गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ३५ वर्षीय रमाझानोव्हा ही गरोदर असूनही ऑलिम्पिक खेळत असल्याचे तिचं कौतुक होत आहे. पण, सध्या चर्चा इंस्टाग्राम पोस्टची सुरू आहे. गरोदरपणात स्पर्धा खेळण्याच्या अनुभवावर रमाझानोव्हाने सांगितले. मॅच दरम्यान जेव्हा शेवटचा शॉट घेत असताना पोटात बाळाने लाथ मारली आणि त्यानंतर परफेक्ट १० शॉट लागला, असे तिने सांगितले आहे.
रमाझानोव्हाने सिन्हुआ न्यूजला सांगितले की, ''शॉट घेण्यापूर्वी तिला तिच्या बाळाची किक जाणवली आणि त्यानंतर तिचा परफेक्ट १० शॉट्स लागला.'' यापूर्वीही गर्भवती महिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या आहेत. अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये गरोदर असूनही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला होता आणि विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती.
रमाझानोव्हाच्या या खिलाडूवृत्तीचं नेटिझन्स कौतुक करत आहेत. एका नेटिझन्सने लिहिले की, हे खूप भारी आहे. सर्व गर्भवती महिलांप्रती आदर आहे. मी नर्स आहे आणि तू एक सुपरहिरो आहेस. अशा महिलांना योग्य ती ओळख मिळत नाही.
दुसऱ्या फॅन्सने लिहिले की, बाळ जन्माला येईल, तेव्हा त्याच्यासाठी एखादं मेडल बनवून ठेवा.
ऑलिम्पिक खेळणारं हे पहिलं बाळ असेल, असे आणखी एका फॅन्सने लिहिले.
ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी रमाझानोव्हा अझरबैजानच्या इतिहासातील दुसरी तिरंदाज आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ओल्गा सेन्युक हिने तिरंदाजीत देशाला पहिला ऑलिम्पिक सहभाग मिळवून दिला होता. पॅरिसमधील महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत रमाझानोव्हाने भाग घेतला होता. तिने राऊंड ऑफ ३२ एलिमिनेशन राऊंडमध्ये २८ क्रमांकाच्या चिनी तिरंदाज एन किक्सुआनचा पराभव केला होता. पण, पुढच्या फेरीत तिला जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनने पराभूत केले.
रमाझानोव्हाने तिच्या गर्भधारणेच्या प्रवासाबद्दल सांगितले, “ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणादरम्यान मी एकटी नसून माझ्या बाळासह सराव करत आहे, हे मला जाणवत होते. माझ्या बाळाला जर तिरंदाजीत रस असेल तर मी त्याला/तिला नक्की शिकवेन.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.