Tennis: स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस वेळापत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुरुष दुहेरी लढतीनंतर एकेरीतील सामना दुपारी दोन वाजता ठेवल्याने तो भडकला आहे.
पुरुष दुहेरीत राफेल नदालने कार्लोस अल्काराझच्या साथीत सलामीचा सामना जिंकला. स्पॅनिश जोडीने अर्जेंटिनाची सहावी मानांकित जोडी मॅक्झिमो गोन्झालेझ व आंद्रे मॉल्टेनी जोडीवर ७-६ (४), ६-४ असा विजय नोंदविला. पहिल्या फेरीतील सामना शनिवारी रात्री दहा वाजता संपला. रविवारी दुपारी दोन वाजता एकेरीच्या पहिल्या फेरीचा सामना होत असल्याने नदाल नाराज आहे.
दुपारी दोन वाजता सामना कसा, अशी विचारणा करत नदालने शनिवारी संध्याकाळी पॅरिसमध्ये माध्यमांना सांगितले की, मला हे वेळापत्रक समजलेले नाही. दोन वाजता सामना खेळणे मला अपमानास्पद वाटते. दुहेरीतील पुढील फेरीत नदाल-अल्काराझ जोडीसमोर एटीपी मानांकनातील माजी अव्वल जोडी नेदरलँड्सचे टॅल्लाँ ग्रीकस्पूर व वेस्ली कुल्हॉफ किंवा हंगेरीच्या मॉर्टन फुस्कोविक्स व फाबियन मारोझान जोडीचे आव्हान असेल.
दुहेरीतील विजयी सलामीनंतर नदालने सांगितले की, सामना उच्च दर्जाचा ठरला. मला वाटते की, आम्ही चांगला खेळ केला. निर्णायक टप्प्यावर आम्ही निर्धाराने खेळलो. प्रतिस्पर्धी एकत्रित खेळणारी जोडी असून जगातील एक सर्वोत्तम मानली जाते. हा एक कठीण सामना होता. आम्ही आनंदही लुटला; पण काही वेळा त्रासही झाला.
नदाल दुखापतीमुळेही चिंतित आहे. सरावात त्याच्या मांडीला दुखापत झाली. त्यानंतर उजव्या पायाच्या वरच्या भागात टेप बांधून तो सामन्यात एक तास व ४७ मिनिटे खेळला; पण या कालावधीत डावखुऱ्या खेळाडूच्या हालचालींत अडथळा जाणवला नाही. आता नदालने एकेरीत खेळण्याचे ठरविल्यास पहिल्या फेरीत हंगेरीचा फुस्कोविक्स त्याचा प्रतिस्पर्धी असेल. तो सामना जिंकल्यास नदालसमोर आणखी एक महान टेनिसपटू व २४ ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच याचे आव्हान असेल. पहिल्या फेरीत जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेन याच्यावर ५३ मिनिटांत ६-०, ६-१ असा विजय नोंदवून दुसरी फेरी गाठली.
मी उद्या खेळू शकेन का, याबाबत अनभिज्ञ आहे. मला क्रीडानगरीत जाऊन संघाशी बोलावे लागेल. स्पेनसाठी अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी योग्य वाटेल असा निर्णय मी घेईन, कधीकधी कमी प्रमाण जास्त ठरते, असे नदाल म्हणाला. तो दोन वेळचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आहे. त्याने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये एकेरीत, तर २०१६ रियो ऑलिंपिकमध्ये दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.