पॅरिस : आशियाई ॲथलेटिक्स व आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पारुल चौधरीने पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
मात्र, दिग्गज खेळाडूंमुळे तिला प्राथमिक फेरीत पहिल्या आठ स्पर्धकांत स्थान मिळविता आले नाही व तिची अंतिम फेरी हुकली. त्याचप्रमाणे तिचा राष्ट्रीय विक्रमही हुकला. दरम्यान गोळाफेकीतील आशियाई विजेत्या ताजिंदरपालसिंग तूरने निराशजनक कामगिरी केली.
मूळची उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील असलेली व मुंबई येथे पश्चिम रेल्वेत कार्यरत असलेली पारुल दुसऱ्या हीटमध्ये शेवटचे दोन किलोमीटर शिल्लक असताना आघाडीच्या जथ्थ्यात होती. त्यानंतर तिची पीछेहाट सुरू झाली. इतर धावपटूंच्या वेगाचा तिला सामना करता आला नाही.
तिने २० स्पर्धकांत १४ वे स्थान मिळविताना १५ मिनिटे १०.६८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. मात्र, तिला स्वतःच्याच नावावर असलेल्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी करण्यातही अपयश आले. तिचा हा विक्रम अवघ्या ०.३३ सेकंदाने हुकला.
१५ मिनिटे १०.३५ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम तिने गेल्या वर्षी अमेरिकेतील स्पर्धेत नोंदविला होता. त्यापूर्वी पहिल्या हीटमध्ये दुसरी भारतीय स्पर्धक अंकिता २१ स्पर्धकांत २० वी आली. तिने १६ मिनिटे १९.३८ सेकंद अशी वेळ दिली.
दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धा, दोनदा आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक, २१.७७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम अशी जबरदस्त कामगिरी असतानाही भारताच्या ताजिंदरपालसिंग तूर पात्रता फेरीत फक्त १८.०५ मीटर इतकी सुमार कामगिरीच करू शकला.
पात्रता फेरीत `अ‘ व ‘ब' असे दोन गट होते. दोन्ही मिळून एकूण ३१ जण सहभागी झाले होते. त्यापैकी दोघांना तिन्ही प्रयत्नात अपयश आले. उर्वरित २९ जणांत ताजिंदरचा क्रमांक शेवटचा लागला. पात्रता फेरीत खेळाडूंना तीनदा संधी मिळते. त्यात पहिल्याच प्रयत्नात तो १८.०५ मीटर फेक करू शकला. दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नात त्याचा ‘फाउल' झाला.
पुरुषांच्या दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा फैसला अखेर अंतिम रेषेवरच झाला. युगांडाच्या तीन वेळच्या विश्वविजेत्या व विश्वविक्रमवीर जोशवा चेप्टेगईने शेवटचे ६०० मीटर अंतर शिल्लक असताना वेग वाढविला आणि २६ मिनिटे ४३.१४ सेकंद या स्पर्धाविक्रमासह अंतिम रेषा पार केली.
त्याने इथिओपियाच्या केनेनिसा बेकेलाने २००८ च्या स्पर्धेत नोंदविलेला विक्रम (२७ मिनिटे ०१.१७ सेकंद) इतिहास जमा केला. तसेच सुवर्णपदक जिंकताना त्याने रौप्यपदक विजेता इथिओपियाचा बेरिहू अरेगावी (२६ मिनीटे ४३.४४ सेकंद) आणि अमेरिकेचा ग्रँट फिशर (२६ मिनिटे ४३.४६ सेकंद) यांना अंतिम क्षणी मागे टाकले.
गतविजेत्या इथिओपियाच्या सेलेमोन बरेगाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे प्रथम १३ धावपटूंनी स्पर्धा विक्रमापेक्षा सरस वेळ नोंदवली. स्पर्धेतील पहिला विश्वविक्रम अमेरिकेच्या ४-४०० मीटर मिश्र रिले संघाने नोंदविला. त्याने ३ मिनीटे ०७.४१ सेकंदाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.