Paris Olympic 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा रविवारी (११ ऑगस्ट) संपली. या स्पर्धेत १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. ३२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात एकूण ३२९ पदकं देण्यात आली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर शेवटची स्पर्धा रविवारी झाल्यानंतर पदक तालिकेतील सर्व क्रमांकांवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये अमेरिकेने चीनला मागे टाकत सलग चौथ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वात शेवटी महिलांची बास्केटबॉलची अंतिम फेरी पार पडली. अटीतटीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने फ्रान्सला ६७-६६ अशा फरकाने पराभूत केले. यामुळे अमेरिकेच्या महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी अमेरिकेचेही ४० सुवर्णपदक झाले.
चीननेही ४० सुवर्णपदक जिंकले आहेत. मात्र अमेरिकेने चीनपेक्षा अधिक रौप्य पदक जिंकल्याने त्यांनी अव्वल स्थान मिळवले.