Champion wrestler Vinesh Phogat - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक देऊन इतिहास रचणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाटचे शनिवारी मयादेशात आगमन झाले. १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आणि तिचे रौप्यपदकही नाकारले गेले. 'भारत की शेरनी' अशा जयघोषात क्रीडाप्रेमींनी विनेशचे स्वागत केले. हे स्वागत व प्रेम पाहून विनेश भावनिक झालेली दिसली आणि तिला अश्रू अनावर झाले.
ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक न देण्याचा निर्णय क्रीडा लवादाने घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कालच ३ पानी पत्र लिहून तिचं मन मोकळं केलं होतं. ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक झाल्याने विनेशला अपात्र ठरवले गेले. त्याविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. त्यामध्ये तिने संयुक्त रौप्यपदक देण्यात यावे अशी विनंती केली होती. तीन वेळा तारीख पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने तिची याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशचे रौप्यपदकाचे स्वप्न भंगले.
पण, ती देशासाठी चॅम्पियन असल्याचे भारतीयांचे मत आहे आणि तिचे स्वागतही जंगी झाले. बजरंग पुनिया व साक्षी मलिक या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी तिचे स्वागत केले. यावेळी विनेश साक्षीच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगही विमानतळावर तिच्या स्वागतासाठी उपस्थित होता. विनेशने यावेळी भारतीयांना दाखवलेल्या प्रेमाचे आभार मानले.