नवी दिल्ली : ऑलिपिंकमध्ये खेळत असताना वैयक्तिक प्रशिक्षक की संबंधित खेळाच्या महासंघाने नियुक्त केलेले प्रशिक्षक असावे या न संपणाऱ्या वादात आता ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने उडी घेतली असून त्याने आपले मत खेळाडूंच्या पारड्यात टाकले आहे. खेळाडूंना आपल्या पसंतीचा प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफ मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्याने ठामपणे सांगितले.
विविध खेळांच्या महासंघाने खेळाडू व संघासोबत आपले प्रशिक्षक नियुक्त केले असताना पॅरिस ऑलिंपिकमध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी आपले वैयक्तिक प्रशिक्षक सोबत नेले आहेत. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे.
त्यामुळे एका खेळाडूसाठी अशाप्रकारे दोन प्रशिक्षक असणे योग्य आहे का, यावर चर्चा सुरू आहे. यावर मत व्यक्त करताना आता राजकारणात आलेले विजेंदर म्हणाले, ज्यावेळी मी बॉक्सिंग करायचो त्यावेळी मला प्रशिक्षक सोबत नेण्याची पूर्णपणे मोकळी होती. तसेच, पसंतीचा साथीदारही निवडण्याचे स्वातंत्र्य होते.
ज्यावेळी मला असे स्वातंत्र्य होते, त्यावेळी अधिकारी म्हणायचे, तुला जे पाहिजे ते मिळेल, आम्हाला कामगिरी किंवा पदक पाहिजे आणि मी तशी कामगिरी करायचो. २००६ ते २०१२ या काळात मी बहुतेक स्पर्धेत चांगली कामगिरी केली व पदके जिंकली.
त्यामुळे प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंची मागणी पूर्ण करायला पाहिजे. पॅरिसमध्ये भारतीय पथकासोबत १४० प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, अधिकारी गेले आहेत. यापैकी ७२ जणांचा खर्च केंद्र सरकार करीत असून यापैकी बहुतेक जण हे खेळाडूंनी मागणी केलेले वैयक्तिक प्रशिक्षक आहेत.
सोशल मीडियाने खेळाडूंचे काम सोपे केले आहे, असे विजेंदर यांना वाटते. माझ्या वेळेपेक्षा आता सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. आता आपल्या फोनमध्ये इंटरनेटची ताकद आहे. त्यामुळे खेळाडूंना जे म्हणायचे आहे,
चिंता व्यक्त करायची आहे, राग व्यक्त करायचा आहे, हे फार लवकर पसरते. जर योग्य व्यक्तीला तुम्ही आपले मत पाठवले तर ते ऐकले जाईल, असे त्यांना वाटते, असे विजेंदर म्हणाले. आमच्या काळात ही सुविधा इतकी ताकदवान नव्हती, असेही तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.