Olympic 2024 Vinesh Phogat Appeal IOC CAS Live : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे खटला सुरू झाला आहे. विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी वजन १०० ग्रॅम जास्त झालं म्हणून अपात्र ठरवले गेले. त्यामुळे भारतीय खेळाडूला फायनलमध्ये खेळण्यापासून रोखले गेले आणि भारताचे हातचे पदकही गेले. याविरोधातत विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली आणि ज्येष्ठ वकिल हरीश साळवे ही विनेशची बाजू मांडत आहेत.
दरम्यान, विनेशच्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी मोठं विधान केलं आहे. IOC अध्यक्ष थॉमस बाक म्हणतात की, ''विनेश फोगाटच्या भावना मी समजू शकतो. पण, अशा परिस्थितींमध्ये सवलत दिल्यानंतर नेमकी रेषा कुठे आखायची याबद्दलही मला खात्री नाही.''
पॅरिसमध्ये आयओसी मीडिया कॉन्फरन्स दरम्यान ते म्हणाले, "मला हे सांगायलाच हवे की, मला कुस्तीपटूबद्दल सहानुभूती आहे. आता तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि शेवटी CAS चा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू, परंतु पुन्हा सांगतो आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाला त्यांचे नियम लागू करावे लागतील. ही त्यांची जबाबदारी आहे.”
विनेशच्या ज्या गटात खेळतेय त्या गटात आता दोन रौप्य पदकं दिली जाऊ शकतात का?, असे विचारले असता बाक म्हणाले, "तुम्ही हे जर सर्वसाधारणपणे विचारत असाल तर, नाही. पण, मला या वैयक्तिक प्रकरणात मत मांडण्याची परवानगी द्या. आंतरराष्ट्रीय महासंघाच्या नियमांचे पालन करावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय महासंघ, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW), हा निर्णय घेत आहे."