Wrestling in Paris Olympic 2024 India : अमन सेहरावतचे कांस्यपदक वगळल्यास भारतीय कुस्तीपटूंना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला. विनेश फोगाट हिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून पदक निश्चित केलं होतं, परंतु अपात्रतेच्या कारवाईमुळे तेही पदक हातचे गेल्यात जमा आहे. विनेशने याविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि १६ ऑगस्टला त्यावरील निकाल अपेक्षित आहे. दरम्यान, कुस्तीपटूंच्या खराब कामगिरीवरून आता ब्लेम गेम सुरू झाला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे ( WFI) प्रमुख संजय सिंग यांनी खेळाडूंच्या खराब कामगिरीला कुस्तीपटूचं आंदोलन कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. कुस्तीपटूंनी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनामुळे खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे सहा कुस्तीपटू गेले होते आणि अमनला पदक जिंकता आले. त्याने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. २१ वर्षीय अमनने प्युएर्तो रिकोच्या डॅरियन क्रूझला पराभूत केले.
विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या ऑलिम्पियन कुस्तीपटूंसह अनेकांनी WFI चे माजी अध्यक्ष बृज भूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करून आंदोलन छेडले होते. त्यामुळे जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाईही केली होती. डिसेंबरमध्ये निवडणुक घेतल्यानंतर संजय सिंग यांनी अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी आता खेळाडूंच्या आंदोलनावर टीका करताना नव्या वादाला तोंड फोडले आहे.
''तुम्ही त्या आंदोलनाकडे वेगळ्या अँगलने पाहिले पाहिजे. आंदोलनामुळे संपूर्ण कुस्तीपटूंमध्ये मागील १४-१५ महिन्यांत गोंधळाचे वातावरण होते. खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेता आल्या न मुळे कुस्तीपटूंचा सराव होऊ शकला नाही. भारताला ऑलिम्पिकमध्येय सहा पदकं जिंकता आली असती, परंतु आंदोलनामुळे त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंना चांगली कामगिरी करता आली नाही,''असे संजय सिंग यांनी इंडिया टुडेला सांगितले.
विनेश फोगाटने ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सहभाग घेतला होता, परंतु फायनलमध्ये पोहोचूनही तिच्या पदकाचा निर्णय अधांतरी आहे. २९ वर्षीय विनेश ही ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती, परंतु १०० ग्रॅम जास्तीच्या वजनामुळे तिला अपात्र ठरवले गेले आणि फायनल खेळण्यापासून रोखले. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि १६ ऑगस्टला त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
विनेशशिवाय अमन, अंशू मलिक ( ५७ किलो), रितिका हूडा ( ७६ किलो), निशा दहिया ( ६८ किलो) आणि अंतिम पंघल ( ५३ किलो) यांनी ऑलिम्पिकमध्ये सहाभाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.