आपण सर्वजण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतो. जे लोक वजन कमी करत आहेत ते जिममध्ये भारी कसरत करतात आणि भरपूर घाम गाळतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एरोबिक व्यायाम करूनही वजन कमी करू शकता.
महिला आणि पुरूष दोघांसाठी एरोबिक व्यायाम महत्त्वाचा आहे. कामाच्या व्यापात ज्यांना जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. ते लोक एरोबिक व्यायाम करू शकतात. हा व्यायाम घरी सहज करता येतो. (What Is Aerobic)
एरोबिक या शब्दाचा अर्थ जास्तीचा प्राणवायू वापरून शरीराला ऊर्जा निर्माण करावी लागते असा होतो. या प्रकारात श्वासउच्छ्वासाची गती वाढते व जास्तीचा प्राणवायू रक्तात येतो. हा प्राणवायू रक्तातून आकुंचन प्रसरण पावणाऱ्या स्नायूंकडे पाठवला जातो व अर्थातच रक्तवहनाची गती वाढवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात.
एरोबिक्स हे केवळ लठ्ठपणा कमी करण्यासाठीच स्त्रीपुरुषांनीच करावयाचे असते असा प्रचार हल्ली केला जातो. परंतु तसे काही एक नाही. सर्वानां आपलं आरोग्य चांगलं राखण्याकरिता एरोबिक क्रिया करता येतात.
या व्यायामात एका रिदमने, तालबद्धतपणे क्रिया कराव्या लागतात. झटकन हालचाल करून, गडबडघाईने ह्या क्रिया करावयाच्या नसतात अन्यथा गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी कमी लागते.
दोन पाय जुळवून सम स्थितीत उभे रहावे.
दोन हात खांद्यांच्या रेषेत समोर करून तळहातांची बोटे एकमेकांत गुंफावीत.
दोन हात कोपरात किंचित वाकवून तळहातांची सांगड छातीकडे आणावी.
अगदी जवळ नव्हे साधारण ८ ते १० इंचाचे अंतर असावे.
नंतर टाचा उचलून फक्त तळपायाच्या चंप्यांवर जागेवरच जलद धावायला सुरूवात करावी.
दम, धाप लागली की जागेवरच थांबावे.
तळहातांची सांगड सोडून दोन हात कंबरेवर ठेवावेत, पायातील अंतर वाढवून विश्रांती घ्यावी.
अतिउच्चरक्तदाबाच्या, हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी वेग थोडा कमी ठेवावा.
दम-धाप जोरात लागल्यास खाली जमिनीवर पाठीवर झोपून विश्रांती घ्यावी. तोंडाला कोरड पडत असल्यास दोन घोट पाणी घ्यावे.
पायाच्या पिंडऱ्यांना चांगला व्यायाम होतो. काहीवेळा पिंडऱ्यात, मांड्यांत गोळे येतात. तेव्हा घाबरू नये, थोडे थांबून पुन्हा क्रिया करावी.
तळपायाच्या स्नायूंची कार्यक्षमता सुधारते, तळपायाच्या छोट्या छोट्या हाडांना व्यायाम होतो. वजन कमी होते.
श्वसनसंस्थेची कार्यक्षमता सुधारते.
एखाद्या कार्डिओ एक्झरसाईज इतकेच यात दमायला होते!
धूळ, धूर उदबत्ती इत्यादींमुळे किंवा अॅलर्जीमुळे दम लागत असल्यास या क्रियेमुळे प्रतिकारशक्ती वाढून दम्याचा त्रास कमी होतो.