भारतात रेणूका मातेची अनेक मंदिरे आहेत. रेणूका मातेचे उपासक जगभर आहेत. ज्यांच्या घरी देवीची परडी असते त्यांना वर्षातून एकदातरी सौंदतीच्या डोंगरावर जावं लागतं. देवीला आंबिल घुगऱ्याचा नैवेद्य असतो. श्रावण, नव्याची पौर्णिमा अशा काही दिवशीही देवीला प्रत्येक घरातून नैवेद्य जात असतो.
अशा या रेणूका मातेबद्दल अनेक आख्यायिका आहेत. देवीची महती सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रेणूका मातेचे पूत्र परशुराम यांनी मातेचे शीर धडावेगळे केले होते. त्यानंतर असं काही घडलं की देवीच्या आधी मातंगी देवीला मान दिला जातो. त्याची एक वेगळी कथा आहे, असे का केले आज या बद्दलच जाणून घेऊयात.
'रेणूका' ही इक्ष्वाकु वंशातील रेणु नावाच्या महाराजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यातील एक हे भगवान परशुराम आहेत. सप्त चिरंजीवांपैकी असलेले भगवान परशुराम हे अजूनही महेंद्र पर्वतावर गुप्त स्वरूपात तप करत आहेत अशी मान्यता आहे.
रेणुका आणि मातंगी यांच्या संबंधाविषयी, रेणुकेचे पारंपरिक उपासक जे गोंधळी त्यांच्या मुखी एक कथा आढळते. माहूरगडावर जमदग्नीचा आश्रम होता. जमदग्नी ऋषी रागीट होते. त्यांची पत्नी रेणुका ही कमालीची पतिपारायण होती. मातेच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे ती रोज नदीवरून पाणी आणायची ते घटात न आणता शेल्यात मोट बांधून आणायची, तरीही पाण्याचा एक टिपूस गळायचा नाही. (Navratri 2024)
एके दिवशी ती अशीच नदीवर पाणी आणायला गेली असता, तिथे गंधर्वांची जोडपी जलविहारासाठी उतरलेली होती. त्यांचा तो मुक्त विलास पाहून आणि गंधर्वांची तारुण्यसुंदर रूपे पाहून रेणुका माता क्षणैक लोभावली. पाण्याची मोट भरून लगबगीने आश्रमात जाण्याचे भान तिला राहिले नाही. ती भानावर आली, तेव्हा तिच्या ध्यानी आले की, आपल्याला पाणी न्यायला उशीर झालेला आहे.
तिने घाईघाईने पाण्याची मोट बांधून शिरावर घेतली, परंतु ती आश्रमाच्या वाटेला लागली तो त्या मोटेतले पाणी गळून तिचे सारे अंग चिंब होऊन गेले. आश्रमात पाऊल ठेवताच जमदग्नीने तिला त्या तशा अवस्थेत पाहिले आणि त्याचा क्रोध अनावर झाला. जमदग्नीने झालेला सर्व प्रकार जाणला आणि आपला पुत्र परशुराम याला रेणुकेचे मस्तक उडविण्याची आज्ञा केली.
परशुरामाने ती आज्ञा तत्काळ अमलात आणली. आपल्या पुत्राच्या पितृभक्तीने प्रसन्न झालेल्या जमदग्नीने पुत्राला 'वर माग' म्हणून सांगितले. त्याने अर्थातच आपल्या आईला जिवंत करण्याचा वर मागितला. जमदग्नीने परशुरामाला संमती दर्शवून म्हटले की, 'तुझ्या आईचे वर उडालेले शिर शोधून ते या धडावर ठेव, म्हणजे ती जिवंत होईल.
' परशुरामाने आईच्या शिराचा खूप शोध केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही. शेवटी निराश होऊन परतताना, त्याला आपल्या आईसारखीच दिसणारी एक मातंग समाजाची स्त्री दिसली. त्याने अगतिकतेने त्या मांतंगीणीचे शिर कापून घेतले आणि ते आईच्या धडावर ठेवण्याचे योजिले.
आश्रमात येऊन ते शिर त्याने आईच्या धडावर ठेवण्याच्या आतच जमदग्नीने परशुरामाचे कृत्य जाणले आणि तसे करण्यास त्याला विरोध केला. मग जमदग्नीने रेणुकेचे शिर स्वशक्तीने आणवून तिला जिवंत केले. आपली आई जिवंत झाली; परंतु तिला जिवंत करण्याच्या प्रयत्नात असताना एक निष्पाप मांतंगी महिल मात्र व्यर्थ मेली, याची परशुरामाला खंत वाटली.
त्याने आपल्या आईच्याच प्रतिष्ठेने त्या महिलेच्या शिराची माहूरगडावर प्रतिष्ठापना केली आणि 'रेणुकेचे भक्त रेणुका-दर्शनापूर्वी तुझे दर्शन घेतील, रेणुकेला नैवेद्य दाखविण्यापूर्वी तुला नैवेद्य दाखवतील,' असे वचन त्याने महिलेला दिले.
रेणुका आणि मातंगी यांच्या निकट संबंधावर प्रकाश टाकणारी ही कथा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. मूळच्या मातंगी देवीचे उन्नतीकरण करून तिला रेणुका हे नाव व नवे चरित्र बहाल करताना रेणुकेच्या उपासनेत मूल रूपाचे स्थान, गौणतेने का होईना, परंतु आद्य पूजेच्या मानासकट राखावे लागले, असा या कथेचा अन्वयार्थ स्पष्टपणे जाणवतो.
पाण्यामध्ये उभी रेणुका नेसून पीतांबर ।
परशुराम बाजूला, मातंगी हाई हो समोर ।।
असा रेणुका व मातंगी यांचा वेगळा उल्लेख येत असला, तरी त्यांतही 'घड आहे एल्लम्माचे । शिर आहे मातंगीचे ।' म्हणून 'पहिला मान दिला मातंगीला ।' ही जाणीव स्पष्टपणे प्रकट झालेलीच आहे.
(संबंधित माहिती रा.चि.ढेरे यांच्या ‘लज्जागौरी’ पुस्तकातून घेण्यात आली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.