सोलापुरात आज लाडक्या बहिणींचा सोहळा! महिलांसाठी 435 बसगाड्या, कार्यक्रमानंतर बसपर्यंत जायचे कसे, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कधी येणार, पार्किंग कोठे, पोलिस बंदोबस्त किती? वाचा...

जिल्ह्यातील १० लाख ६३ हजार ६६३ महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असून, त्यातील दहा लाख सात हजार ८७९ महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या महिलांसाठी आज (मंगळवारी) सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे.
cm ladki bahin yojna
cm ladki bahin yojnaesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ६३ हजार ६६३ महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असून, त्यातील दहा लाख सात हजार ८७९ महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या महिलांसाठी आज (मंगळवारी) सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. या भावांकडून लाडक्या बहिणींसाठी कोणती नवी घोषणा होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

सोलापुरातील वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांचे ३५ ते ४० हजार महिला लाभार्थी आणले जाणार आहेत. त्यांना गावातून आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून ४३५ बस भाड्याने घेण्यात आल्या आहेत. साधारणतः जिल्ह्यातील १२० गावांमध्ये या बस जातील. बसमध्ये तलाठी, आशासेविका, अंगणवाडी सेविका असणार आहेत. एसटी प्रवासात त्या महिला लाभार्थींना उपवासाचे पदार्थ, पाण्याची सोय असणार आहे. प्रत्येक बसमधून येणाऱ्या या महिला लाभार्थींचे नाव आणि मोबाईल क्रमांक घेण्यात आले आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठ दिवसांपासून तयारी केली आहे.

आंदोलनाच्या पवित्र्यातील लोकांवर पोलिसांचा वॉच

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी मंगळवारी सोलापुरात येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर काहींनी यापूर्वी आंदोलन करण्याचा, कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. शहर पोलिसांनी अशा लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून, काहींना बोलावून त्यांच्याकडे चौकशी देखील केली आहे. कार्यक्रम यशस्वी व्हावा, गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिस घेत आहेत.

वचनपूर्ती सोहळ्यासाठी ११५० पोलिसांचा बंदोबस्त

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी मंगळवारी (ता. ८) सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. त्यात कार्यक्रम ठिकाण, बसमधून ज्या ठिकाणी महिला उतरतील आणि ज्या ठिकाणाहून बसतील त्या ठिकाणी आणि विमानतळ ते कार्यक्रमाचे ठिकाण या रस्त्यावर हा बंदोबस्त असेल. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यन्त बंदोबस्त असणार आहे. त्यात एक हजार पोलिस अधिकाऱ्यां‍सह १५० होमगार्ड असणार आहेत.

बस कोठे थांबणार अन् पार्किंग

  • चार हुतात्मा पुतळ्याजवळ बस थांबतील आणि त्या बस जुनी मिल कंपाउंड व करजगी मैदानावर पार्किंग करण्यात येणार

  • डफरीन चौकात बसमधून लाभार्थी उतरतील आणि त्या बस एक्झिबिशन ग्राउंड व भंडारी ग्राऊंडमध्ये पार्किंग असेल

  • श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील पासपोर्ट कार्यालयाजवळ थांबणाऱ्या बसचे पार्किंग कर्णिकनगर, कुचन प्रशाला व वल्याळ मैदान येथे पार्किंग असेल.

-----------------------------------------------------------------------------------------

कार्यक्रमानंतर लाभार्थींना पार्किंगपर्यंत जावे लागेल

डफरीन चौक व चार हुतात्मा पुतळ्याजवळ लाभार्थींना उतरवून त्या बस जुनी मिल कंपाउंड व करजगी मैदान, एक्झिबिशन ग्राउंड व भंडारी ग्राउंड येथे पार्किंग केल्या जाणार आहेत. कार्यक्रम संपल्यावर या दोन्ही ठिकाणी उतरलेल्या महिला लाभार्थींना पार्किंगच्या ठिकाणापर्यंत चालत जावे लागणार आहे. ज्या बसमधून महिला लाभार्थी येतील, त्याच बसमधून त्यांना परत जावे लागेल. दुसरी बाब म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील पासपोर्ट कार्यालयाजवळ उतरलेल्या महिला लाभार्थींना घ्यायला त्याच ठिकाणी पुन्हा बस येतील. त्यांना जागेवरूनच बस असणार आहेत.

व्हीआयपींसह कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी येथे पार्किंग
कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्हीआयपी लोकांसाठी नॉर्थकोट मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनांसाठी हरीभाई देवकरण प्रशाला, स्काऊट गाईड मैदान व संगमेश्वर कॉलेज येथे पार्किंगची व्यवस्था आहे. त्याप्रमाणे दुचाकीसाठी श्री सिद्धेश्वर मंदिर पार्किंग व हुतात्मा मंदिर पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे आज सोलापुरात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ते मुंबई विमानतळावरून सोलापूरच्या दिशेने निघतील. दुपारी सव्वाबारा वाजता ते सोलापूर विमानतळावर पोहचणार आहेत. तेथून ते दुपारी साडेबारा वाजता ते होम मैदानावर येतील. सोलापुरात होम मैदानावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वचनपूर्ती सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही उपस्थिती असतील. दरम्यान, मुख्यमंत्री त्यांच्या वर्षा निवासस्थानावरून सकाळी अकरा वाजता मुंबई विमानतळाकडे निघतील. साडेअकरा वाजता सोलापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. ४५ मिनिटात ते सोलापूर विमानतळावर दाखल होणार असून तेथून १५ मिनिटात ते कार्यक्रमस्थळी येतील. दुपारी अडीच वाजता कार्यक्रम आटोपून ते लगेचच सोलापूर विमानतळाच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी पावणेतीन वाजता ते सोलापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस साडेदहाला सोलापुरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता. ८) सकाळी पावणेदहाला मुंबईहून विमानाने सोलापूरच्या दिशेने रवाना होतील. साडेदहा वाजता ते सोलापूर विमानतळावर दाखल होतील. तेथून ते मोटारीने अक्कलकोटमधील फत्तेसिंह क्रिडांगणाकडे रवाना होतील. विविध विकासकामांचे लोकार्पण करून ते दुपारी १२ वाजता होम मैदानावरील वचनपूर्ती सोहळ्याकडे येतील. साडेबाराला कार्यक्रमस्थळी दाखल होतील. अडीच वाजता विमानतळाच्या दिशेने निघणार असून पावणेतीन वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.