राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगमी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान सत्ताधारी पक्षांनी देखील कंबर कसली असून या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वीच 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' या दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या योजनांसाठी राज्याच्या तिजोरीतून मोठा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र यासोबतच आता सरकारकरने जाहीर केलेल्या या योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी देखील मोठा खर्च केला जाणार आहे.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठीच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून जाहिरातींवर २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
तर सरकारकडून १३६ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च हा बाह्यप्रसिद्धीसाटी केला जाणार आहे. तर ३९ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च हा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रसिद्धीवर होणार आहे. डिजीटल माध्यमांमधील प्रसिद्धीसाठी ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर राज्य आणि राज्याबाहेरील वृत्तपत्रातील प्रसिद्धीसाठी तब्बल ४० कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेनुसार २१ ते ६५ वयोगटातील अडिच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलेला दर महिन्याला १५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार असल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चर्चेत होता.
लाडकी बहीण योजनेसोबतच राज्य शासनानं राज्यातील बेरोजगार तरुणांना १०,००० रुपयांपर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' (CMYKPY) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेला लाडका भाऊ योजना असे देखील म्हटले जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याद्वारे १२ वी पास असलेल्या तरुणांना ६००० रुपये प्रति महिना, १२ वी पाससह डिप्लोमा धारकांना ८००० रुपये प्रति महिना तर ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या तरुणांना १०,००० रुपये प्रति महिना इतकं विद्यावेतन देण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.