Shivaji Maharaj Statue: छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुदैवी आहे. अशा घटनेचे राजकारण करणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्षांना महाराष्ट्राची जनता घरी बसविणार आहे. यातून कुणाचीही सुटका नाही. असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे दिला.
पुतळा दुर्घटनेतील दोषी पळून कसे जाऊ शकतात. त्यांना शोधून योग्य तो तपास व्हायला हवा. दोषी व्यक्ती कोणत्याही मंत्र्यांचा मित्र असू दे, तो पंतप्रधानांचा जरी मित्र असला तरी त्याला पकडून जेलमध्ये सडवले पाहिजे असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.काल रात्री मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मंगल कार्यालय येथे दाखल झाले होते.
आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, अर्चना घारे परब, बाळा गावडे यांच्यासह मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी व शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.
जरांगे पाटील म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच्या पवित्र भूमीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अशा तऱ्हेने कोसळणे ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. कुणीही दोषी असो तो तुरुंगातून सुटता नये. त्याचप्रमाणे भविष्यात महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेण्यात यावी. राजकोट येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
.
छत्रपतींचा पुतळा दुर्घटनेची सध्या युती आणि आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण सुरू केले आहे दोघांनीही अशी नाटके सुरूच ठेवली तर जनता त्यांना घरी बसविणार आहे. थोड्या दिवसात दूध का दूध पानी का पानी होणार असून जनताच हिशोब करेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
वाढवण बंदराच्या कामात जर मच्छिमार समाज विस्थापित होणार असेल तर महाराष्ट्रातील मराठा समाज या मच्छीमारांच्या बाजूने उभा राहणार आहे. वाढवण येथील जनआंदोलन हे मच्छीमारांच्या रोजी रोटीच्या प्रश्नासाठी आहे. या प्रकल्पाबाबत मी माहिती घेत असून सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. या घटनेची पाहणी करणे, महाराजांचे दर्शन घेणे हे माझे कर्तव्य असल्याची भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
मालवण राजकोट किल्ल्यावर पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेपाटील हे पाहणी करण्यासाठी आले असता यावेळी मराठा समाज समर्थकांनी सरकारच्या निषेधार्थ फलक दाखविले आणि आपला संताप व्यक्त केला.
आज मालवणात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे राजकोट येथे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्यासमवेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही या ठिकाणी भेट दिली. यावेळी भीमसैनिकांनीही हजेरी लावली. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.