मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सोमवारी (ता. १६) मध्यरात्रीपासून आपले सहावे बेमुदत उपोषण सुरू केले. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सत्ताधाऱ्यांना ही शेवटची संधी असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मान्य करण्याची मागणी त्यांनी केली.
जरांगे म्हणाले, 'सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. मराठा-कुणबी एक असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा, हैदराबादसह सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे, सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, काम सुरू करावे, शिंदे समिती 'ईडब्ल्यूएस्'सह तिन्ही पर्याय सुरू ठेवावेत, शासनाने मागण्यांची तातडीची अंमलबजावणी करावी, यासाठी यापूर्वी स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करीत आहे.