‘मते वाढवण्यासाठी प्रत्येक घरात पोहोचा, प्रत्येक बूथवर ३० मते जरी वाढवली तरी मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा आपण जिंकू. मराठवाडा आपलाच आहे’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठवाड्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा कानमंत्र दिला.
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांची मराठवाडास्तरीय संवाद बैठक मंगळवारी (ता. २४) ‘एमजीएम’ परिसरातील रुक्मिणी सभागृहात झाली.
त्यावेळी ते बोलत होते. भाजप नेते, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे नेते शिवप्रकाश, विनोद तावडे, डॉ. भागवत कराड, अशोक चव्हाण, अतुल सावे, अजित गोपछडे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, संजय केणेकर आदी उपस्थित होते.