CM Eknath Shinde : बहिणीच देतील विरोधकांना उत्तर; योजना सुरूच राहणार

‘लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी अपप्रचार (फेक नॅरेटिव्ह) करून मते मिळवली. आता विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा तो प्रयोग चालणार नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी अपप्रचार (फेक नॅरेटिव्ह) करून मते मिळवली. आता विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा तो प्रयोग चालणार नाही. आमच्या लाडक्या बहिणीच विरोधकांना उत्तर देतील. ‘माझी लाडकी बहीण योजना’ बंद व्हावी, म्हणून सावत्र भाऊ खोडा घालत आहेत. त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. ही योजना बंद होणार नाही, उलट दीड हजाराचे दोन, अडीच, तीन हजार रुपये देऊ,’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. ही योजना सुरूच राहिल, बहिणींनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘लाडकी बहिण ही काही निवडणुकीपुरती योजना नाही. दिवाळीचे पैसे देताना सावत्र भाऊ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसेही आगाऊ दिले आहेत. आधीच्या सरकारच्या आणि आमच्या सरकारच्या कामांची तुलना करा; होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी !’ यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर नेते व अधिकारी उपस्थित होते.

बापाशी भिडा - शिंदे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ‘कार्ट्याला काय कळते’ अशा शब्दांत केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. ‘त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते बिथरलेले आहेत, म्हणून असे बोलताहेत. ‘मला मुख्यमंत्री करा’ म्हणत ठाकरेच दिल्लीत फिरतात. यालाच म्हणतात, हिऱ्यापोटी गारगोटी! लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा ना,’ असे आव्हानही त्यांनी ठाकरेंना दिले.

‘सावत्र भावांना आनंद नाही’

‘विरोधक म्हणायचे की खात्यात पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. तुमच्या खात्यात पैसे आल्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु सावत्र भावांना असा आनंद झालेला नाही, त्यामुळे ते न्यायालयात गेले आहेत. आमच्या बहिणी पाठीशी असताना, विरोधकांचे सरकार येणार नाही,’ असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आणखी अनेक योजना आणायच्या आहेत, त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

‘महायुतीला मतदान करा’

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘अनेक सरकारे आली, योजना आल्या; परंतु लाडकी बहिण योजना सर्वांत लोकप्रिय ठरली. विरोधक योजना बंद पडेल असे सांगतात, पण हीच काय, मुलींना मोफत शिक्षणाची योजनादेखील बंद होणार नाही.’ या योजना पुढे चालू राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.