नारायण गडावर दसरा मेळावा गाजवणारे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी लाखोंच्या उपस्थितीत त्यांनी 'झुकायचं नाय' असा सणसणीत हुंकार भरला. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे यांनी संघर्षाचा नारा दिला. हा दसरा मेळावा मराठवाड्यात मोठ्या जोशात पार पडला. याचवेळी पंकजा मुंडे यांचा मेळावा भक्ती भगवान गडावर सुरू असल्यामुळे, दोन्ही मेळावे मराठवाड्यातील वातावरण तापवणारे ठरले.
मनोज जरांगेंनी आपल्या भाषणाची सुरुवात "जय शिवराय" च्या घोषणेने केली. नारायण गडावर झालेल्या या भव्य मेळाव्यात सुमारे ५०० एकर परिसरात लाखो मराठा बांधव उपस्थित होते. या गर्दीने मनोज जरांगेंना मोठा आधार दिला. "आपल्या समाजाला कधी जातीवादात ओढले गेले नाही. आपण नेहमीच न्यायाची बाजू घेतली, पण अन्याय सहन केला नाही," असे ते म्हणाले.
"जर अडवणूक झाली तर उठाव करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील उठाव केला होता, आपल्याला सुद्धा अन्यायाविरुद्ध लढा उभारावा लागणार आहे," असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "आमच्या समाजाने राज्याच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी खूप संघर्ष केला आहे. तलवारी हातात घेऊन लढलो, मान कापली गेली, पण कधीच हार मानली नाही," असा संघर्षाचा इतिहास त्यांनी उभा केला.
मनोज जरांगे यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नारायण गडावरचा आशीर्वाद मिळाल्यावर दिल्लीला सुद्धा झुकवता येते. "या गडाच्या आशीर्वादाने दिल्लीवर दबाव निर्माण करता येतो. दिल्लीला जाऊन जे उलटले, त्यांना जनतेने उलटवलं," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. "जर अडवणूक झाली तर इच्छा नसतानाही उठाव करावा लागेल," असेही त्यांनी ठासून सांगितले.
आरक्षणाच्या लढ्यात मराठा समाज आक्रमक
"आमच्या समाजाच्या वाट्याला फक्त अन्याय आला. आमचं पाप काय, ते कुणीतरी सांगावं," असे भावनिक उद्गार जरांगे यांनी काढले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांचा हुंकार मोठा ठरला असून, त्यांनी दिल्लीपासून राज्यापर्यंतच्या नेतृत्वाला इशारा दिला आहे की, मराठा समाजाचा तगडा विरोध सहन करावा लागणार आहे.
मनोज जरांगे यांनी सांगितले की, मराठा, मुस्लिम, ओबीसी समाजावर अन्याय होत आहे आणि त्यांच्यावर षडयंत्र रचले जात आहे. जर आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही, तर या वेळेस मोठी उलथापालथ होईल असे त्यांनी इशारा दिला. त्यांनी समाजाला आवाहन केले की, आपल्या समाजाच्या लेकरांना मान खाली घालावी लागू नये, त्यांना अधिकारी बनलेले पाहायचे आहे. जर कोणतीही अवलाद आपल्याला झुकवायला आली, तरी आपण झुकायचं नाही, असा निर्धार त्यांनी दाखवला. शेवटी त्यांनी समाजाच्या न्यायासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे सांगितले.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजाला न्याय मिळत नाही आणि शेतकरी व गरीब लोकांवर अन्याय होत आहे. त्यांनी सरकारविरोधात उठाव करण्याचा इशारा दिला आणि समाजाला एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, १४ महिन्यांपासून समाजाचा उठाव सुरू आहे आणि हा उठाव जातीयवादाविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या लोकांचे कौतुक केले आणि सांगितले की, विजय निश्चित आहे, फक्त थोडा धीर धरण्याची आवश्यकता आहे.
"दुसऱ्याच्या अंगावर गुलाल टाकण्याच्या नादात आमच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका," असे स्पष्ट शब्दांत वक्तव्य करत, सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, आता काही जातींना आरक्षण दिलं जात आहे, पण यामुळे आमच्या हक्कांवर अन्याय होत आहे. आरक्षणाचे आश्वासन मिळालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जर सरकारने आरक्षण दिलं नाही, तर आमचं आंदोलन थांबणार नाही, आणि आम्ही सरकारला सडेतोड उत्तर देऊ, असं त्यांनी ठामपणे जाहीर केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.