येरमाळा : येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज गुरुवारी होणाऱ्या घटस्थापनेने सुरवात होत आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टने केलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीची पाहणी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी मंगळवारी (ता. एक) सायंकाळी केली.
राज्याच्या अनेक भागांतून घटस्थापनेसाठी भवानीज्योत घेऊन जाणाऱ्या नवरात्र मंडळाच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी असते. नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर मानला जातो. नवरात्र काळात महिला भाविकांची गर्दी असते.
देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी पूर्ण तयारी केली आहे. नवरात्र काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. एक) सायंकाळी धाराशिवचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंदिराच्या डोंगराभोवती अडलेल्या खेटा मार्ग, मंदिराकडे जाणाऱ्या, येणाऱ्या पायरी मार्गाची, स्वच्छता, दर्शन सभामंडप, दर्शनरांग, भक्तनिवास, मंदिराच्या कमानी, विद्युत रोशनाई, मंदिर परिसरात नवरात्र काळात भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था आदी बाबींची त्यांनी पाहणी केली. यावेळी येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि महेश क्षीरसागर, पोलिस कर्माचारी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
भक्तिमय वातावरण
छत्रपती संभाजीनगर, जालना बीड, नगर, नाशिक, परभणी, हिंगोली, जिल्ह्यातून तुळजापूर तसेच येरमाळा येथून पायी भवानीज्योत घेऊन जाणाऱ्या नवरात्री मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यांच्या वाहनांची मंदिर परिसरात गर्दी होती. दोन दिवसांपासून हलगी, ढोल, ताशे, संभळ तर कोणी लाउड स्पीकर, डीजेवर आराधी गाण्यांच्या गजरात भवानीज्योत घेऊन जात होते. भवानीज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या नवरात्र मंडळांच्या वाहनांची राष्ट्रीय महामार्गांवर वर्दळ वाढली असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस बंदोबस्त तैनात
येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवनिमित्त ५ पोलिस अधिकारी, ५० महिला पोलिस, पुरुष कर्मचारी, १५० महिला होमगार्ड, पुरुष कर्मचारी नवरात्र बंदोबस्त कामी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली असल्याचे सपोनि महेश क्षीरसागर यांनी सांगितले.
आरोग्य बूथची व्यवस्था
येडेश्वरी नवरात्र महोत्सवाच्या काळात येडेश्वरी मंदिरावर एका आरोग्य बूथची व्यवस्था करण्यात आली असून दररोज तालुक्यातील ११ डॉक्टर सोबतीला आसणार आहेत. तसेच, दोन मलेरिया कर्मचारी, एक नर्स अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर बिरादार यांनी सांगितले. तसेच, देवस्थान ट्रस्टने मंदिरावर भाविकांसाठी आरओच्या फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.