Paani Movie Review: हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! सरळ, साध्या माणसाची असामान्य गोष्ट दाखवणारा 'पाणी' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Paani Movie Review: हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे.
pani movie review
pani movie review esakal
Updated on

आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली असली आणि आधुनिक विकासाचे वारे जरी वाहात असले तरी आजही कित्येक खेडोपाड्यांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. आजही कित्येक गाव आणि वाड्यांना दूरदूरहून कठोर परिश्रम करून पाणी आणावे लागत आहे. पाणी या चित्रपटामध्ये नेमका हाच विषय हाताळण्यात आला आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याने महाराष्ट्रातील एका भीषण वास्तव विषयाला हात घातला आहे. अर्थात हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या संघर्षाची, त्याच्या जिद्दीची गोष्ट मांडताना त्याला प्रेमाचा सुंदर असा ओलावा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे नावाचा एका साध्या कुटुंबातील तरुण. या तरुणाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तो आणि त्याचे कुटुंबीय जमलेले असतात. नांदेडजवळच्याच सुवर्णा नावाच्या मुलीच्या कुटुंबीयांसोबत बोलणी सुरू होतात. हनुमंताला सुवर्णा पसंत असते आणि तो आपला होकार त्यांना कळवितो. परंतु जेव्हा सुवर्णाच्या घरातील मंडळींना नागरवाडी या गावात पाणीटंचाई आहे आणि खूप दूरवरून पाणी आणावे लागते तेव्हा ते लग्नाला नकार देतात. खरं तर नागरवाडी गाव हे दुष्काळग्रस्त असते. तेथे पाणीटंचाईची भीषण समस्या असते. पाच ते सहा किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे त्या गावातील तरुणांना कुणी मुली देत नसते. पाण्याच्या या समस्येमुळे कित्येक तरुणांची लग्ने मोडलेली असतात.

हनुमंतचेही लग्न तुटलेले असते. परंतु हनुमंत आणि सुवर्णा या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचा ओलावा निर्माण झालेला असतो. त्यामुळे एकीकडे आपले प्रेम सफल करण्यासाठी आणि दुसरीकडे गावातील पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी हनुमंत कसा संघर्ष करतो. मग त्यामध्ये त्याला कोणकोणते अडथळे येतात..त्यावर तो कशी मात करतो...गावातील मंडळी त्याला कितपत आणि कशा प्रकारे साथ देतात..मग त्यामध्ये तो कशा पद्धतीने यशस्वी ठरतो...अशी एकूणच हनुमंत केंद्रे या जलदूताची प्रेरणादायी कथा या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने ही वास्तववादी कथा सुरेख गुंफली आहे. ती गुंफताना त्याला प्रेमाची सुंदर अशी झालर चढविली आहे.

गावातील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न, हा प्रश्न सोडविण्यासाठी हनुमंत केंद्रे यांची चाललेली धडपड, त्याकरिता गावातील मंडळींना एकत्र आणण्यासाठी तो करीत असलेली कसरत, त्यातच गावातील राजकारणाचा त्याला करावा लागलेला सामना, त्याच्या मनातील सुवर्णा या मुलीवरील असलेले हळवे प्रेम या सगळ्या बाबी दिग्दर्शक म्हणून त्याने पडद्यावर छान मांडलेल्या आहेत. एका सामाजिक विषयाला सुरेख असा साज त्याने चढविला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही. अभिनेता आदिनाथ कोठारेने या चित्रपटामध्ये हनुमंत केंद्रे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्या व्यक्तिरेखेचे विविध कंगोरे त्याने पडद्यावर छान टिपले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्याचा चाललेला संघर्ष...त्याची जिद्द आणि मनामध्ये त्याच्या प्रेमाची चाललेली घालमेल असे भूमिकेचे बेअरिंग त्याने छान पकडले आहे.

अभिनेता सुबोध भावे. ऋचा वैद्य, किशोर कदम, नितीन दीक्षित, गिरीश जोशी आदी कलाकारांनी छान काम केले आहे. चित्रपटातील संवाद आणि चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. स्थानिक बोलीभाषा प्रभावीपणे झाली आहे. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. मात्र त्यानंतर चित्रपटाची कथा चांगलीच वेग पकडते आणि एक सरळ व साध्या स्वभावाचा सामान्य माणूस असामान्य अशी गोष्ट आपल्या जिद्दीने, संघर्षाने आणि मनातील प्रेमाच्या हुंकाराने कशी पूर्ण करतो हे य चित्रपटामध्ये दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे तो नक्कीच पाहायला हवा असाच आहे. एका सामाजिक विषयावरील हा चित्रपट आहे. त्यामध्ये तुम्हाला नेहमीचा मालमसाला किंवा मनोरंजनात्मक मूल्ये दिसली नाही तरी वास्तववादी विषयावरील चित्रपट आहे.

pani movie review
ऑक्टोबरमध्ये कुठल्या झाडाला आंबे लागतात? 'लाडकी बहीण'वरून अमृता खानविलकर ट्रोल, नेटकरी म्हणाले- चंद्रा बाई..

Related Stories

No stories found.