कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणारे आपण कोण? कमेंटचा उद्रेक अन् फुकटचा शहाणपणा कधी थांबणार

Marathi Actors And Their Trolling: सध्या सोशल मीडियावर इतरांना खासकरून कलाकारांना ट्रोल करण्याचं प्रमाण फार प्रमाणात वाढलंय. आपण खरंच या गोष्टीकडे इतकं लक्ष देणं गरजेचं आहे का?
marathi actors on trollers
marathi actors on trollers esakal
Updated on

सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कलाकार सगळ्यांनाच हल्ली सोशल मीडियावर सरसकट ट्रोल केलं जातं. सोशल मीडिया हा एकमेकांसोबत जोडलं जाण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. मात्र या ट्रोलिंगमध्ये कलाकारांना ट्रोल करण्याचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडला जातो. मात्र त्यानंतर आपण सोशल मीडियावर त्यांना काहीही बोलू शकतो असा एक समज काही नेटकऱ्यांमध्ये निर्माण होतो. ज्यांना चेहरा नाही, नाव नाही असे अनेक लोक या सेक्शनमध्ये दिसतात. अगदी महाराजांचा फोटो डीपीला ठेवून अर्वाच्च भाषेत कमेंट करणारे महाभागही आपल्याला या यादीत दिसतील. पण खरंच प्रत्येकवेळी दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल आपलं मत मांडणं गरजेचं आहे का? ट्रोलिंगची अशी काही उदाहरणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कलाकार आणि ट्रोलिंग

गेल्या काही वर्षात कलाकारांच्या उगीच ट्रॉलिंगचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणा करण्यात येत होती. मात्र ते शब्द सौम्य होते. आता शब्दांचं कोणतंही तारतम्य नसलेले कमेंट करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं. अशीच वागणूक यापूर्वी अमृता खानविलकर हिला देण्यात आली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जात होतं. तर सोनाली कुलकर्णी हिचीदेखील तीच अवस्था होती. सिद्धार्थ जाधव याला अजूनही त्याच्या दिसण्यावरून बोललं जातं. कलाकारांचं कर्तृत्व कमेंट करणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त असलं तरी आपण त्यांचे प्रेक्षक आहोत त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं समजलं जातं.

कपिल होनराव आणि करवाचौथ

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील मल्हार म्हणजेच कपिल होनराव याने 'बिग बॉस मराठी ५' विजेता सुरज चव्हाण याच्याबद्दल आपलं मत मांडलं होतं. मात्र त्यावर नेटकऱ्यांनी विशेषतः सुरजच्या चाहत्यांनी कपिलला टारगेट केलं. बिग बॉस संपून अनेक दिवस लोटले असले तरी हे ट्रॉलिंग सुरूच आहे. त्यातच त्याने आणि त्याच्या पत्नीने साजरा केलेला करवा चौथ म्हणजे नेटकऱ्यांना आयतं कोलीत मिळालं. पण महत्वाची गोष्ट अशी की कपिलची पत्नी ही उत्तर भारतीय आहे. त्यामुळे ती तिचे संस्कार आणि परंपरा जपत होती. जशी ती कपिलसोबत मराठी सण साजरे करते तशीच ती तिच्या माहेरचे सणही साजरे करते. मात्र यावरही कपिलला नको नको त्या भाषेत बोललं गेलं.

कलाकार आणि मुलं

कलाकारांच्या मुलांवरूनही नेटकरी सर्रास बोलताना दिसतात. कुणाच्या मुलांनी कुठे जाऊन शिक्षण घ्यावं, कुठे काम करावं, किती पैसे कमवावे हेदेखील ही मंडळी ठरवताना दिसतात. अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे, प्रसाद ओक याच्या मुलाने त्याच्यासाठी महागडी कार घेतली. त्यावरही हा एवढा मोठा झाला का, असं काय काम करतो हा परदेशात, असं किती कमावतो जे गाडी भेट केली असे अनेक प्रश्न विचारले गेले. अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत परदेशात शेफ आहे. तो त्याचं आवडतं काम करतोय. परंतु, त्यालाही त्याच्या हॅण्डलवर जाऊन हिणवलं जातं. हे सगळं कशासाठी, यातून काय साध्य होतं? असा एकच प्रश्न उरतो.

ट्रोलर्स आणि मानसिकता

आपण बोलतो तेच खरं, समोरच्याला काहीही समजत नाही असा त्यांचा एक भाबडा समज असतो. परंतु, सत्य काहीतरी वेगळंच असतं. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. समोरचा आनंदी आहे तर आपणही त्याच्या आनंदात सुख मानावं अशी मानसिकता आता ढासळत चालली आहे. माणसाची वैचारिक पातळी घसरत आहे आणि सहनशीलता कमी होतेय. कलाकारांवर किंवा इतर कुणावरही कमेंट करत त्याला ट्रोल केलं म्हणजे आपण मोठं काहीतरी केलंय. त्याला त्याची चूक दाखवलीय असं काही नेटकऱ्यांना वाटतं. परंतु, प्रत्यक्षात तुम्ही जेवढं घाण बोलाल तेवढी तुमची बौद्धिक पातळी समजते. समोरच्यावर टीका करताना आपण कोणत्या शब्दांची निवड करतो हे इथे महत्वाचं ठरतं.

marathi actors on trollers
ते दोन शब्द अन् तुटली कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री; अभिनेत्याने सांगितलेलं सेटवर काय घडलेलं

कलाकार काय म्हणतात

ट्रोलिंगवर कलाकार नेहमीच दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडतात. मात्र अनेकदा हे ट्रोलिंग त्यांच्याही सहनशक्तीच्या पलीकडे जातं त्यावेळेस मात्र कलाकारही सडेतोड उत्तर देताना दिसतात. तुम्हाला जर आमचे फोटो व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही आम्हाला अनफॉलो करा पण घाणेरड्या भाषेत कमेंट करू नका असं कलाकार म्हणताना दिसतात. सोबतच तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर तुम्ही योग्य त्या भाषेत आम्हाला सांगा. तुमच्या मतांचा आदरच आहे. प्रेक्षक हाच आमचा मायबाप आहे. मात्र त्यामुळे तुम्हाला अर्वाच्च भाषेत आमच्यावर आणि कुटुंबावर कमेंट करण्याचा अधिकार मिळत नाही असं मत कलाकारांनी मांडलं आहे.

तर कलाकारांनीही स्वतःची निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यापूर्वी विचार करावा. त्यामुळे तुम्ही तुमचीच इमेज खराब करत आहेत. सरतेशेवटी, कलाकार असो किंवा सर्वसामान्य माणूस, समोरच्याच्या बोलण्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम हा होतोच, तुमच्या एका वाईट कमेंटमुळे समोरच्या व्यक्तीचं आयुष्य कदाचित कायमचं अंधकारात जाऊ शकतं हे प्रत्येक सुजाण प्रेक्षकाने लक्षात ठेवायला हवं. याच कमेंट जर आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत येऊन पोहोचल्या तर त्याचा आपण कसा सामना करू असाही प्रश्न स्वतःला विचारणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे हातात फोन असला तरी त्याचा वापर कसा आणि किती करायचा याचा सारासार विचार होणं गरजेचं आहे.

marathi actors on trollers
दिलीप कुमार यांनी गमावलेलं त्यांचं आठ महिन्याचं बाळ; म्हणालेले- सगळा दोष सायराला दिला गेला पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.