Bigg Boss Marathi Controversy: सध्याच्या 'बिग बॉस मराठी ५' चा सीझन गेमपेक्षा काही वेगळ्याच कारणामुळे गाजतोय. घरात असलेल्या निकी आणि जान्हवी यांनी संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे. घरात अनुभवी कलाकारांचा वारंवार अपमान केला जातोय. यापूर्वी जान्हवीने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला होता. मात्र त्यानंतरच्या टास्कदरम्यान तिने पंढरीनाथ कांबळे याचाही अपमान केला. त्याला जोकर म्हणत तिने ओव्हर ऍक्टिंगचा टॅग दिला होता. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला होता. आता त्यावर पंढरीनाथ यांची मुलगी ग्रीष्मा हिने एक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरीनाथ यांच्या मुलीने पोस्ट करत लिहिलं, 'जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे. हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.'
'खरंतर “Overacting” हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, स्पर्धकाच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी खासकरून वर्षा उसगांवकर यांच्या आणि पंढरीनाथ कांबळेच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनंही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.'
'मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस. जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही… आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या Career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं!! हा तुझा “Fair Game” संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.'
'त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.' तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या शांत शब्दांसाठी तिचं कौतुक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.